नागपुरी जल्लोषाला कानपुरी तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:02 AM2018-03-25T00:02:43+5:302018-03-25T00:14:43+5:30

अंकित तिवारी...बस नाम ही काफी हैं. जितका तो चेहऱ्याने देखणा तितक्याच गोड गळ्याचा धनीही. या धनवान गायकाला ‘याचि देही, याचि डोळा’ गाताना पाहण्यासाठी हजारो नागपूरकर रसिकांनी शुक्रवारी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात तूफान गर्दी केली होती.

Nagpuri Jhalloshala Kanpuri Tadka | नागपुरी जल्लोषाला कानपुरी तडका

नागपुरी जल्लोषाला कानपुरी तडका

Next
ठळक मुद्देपाचव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराने रसिकांना दिला अविस्मरणीय आनंदअंकित तिवारीचा धम्माल परफॉर्मन्सअंजली गायकवाड, ब्रजवासी ब्रदर्सनेही जिंकली मनेसप्त-सुरांच्या निनादात ज्योत्स्ना दर्डा यांना संगीतसाधकांची सुरेल श्रद्धांजलीलोकमत, परिवार चाय, हिलफोर्ट पब्लिक स्कूल, ९२.७ बिग एफएम, ब्राईट आऊटडोअर व ग्रीन ट्युन्सचे देखणे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंकित तिवारी...बस नाम ही काफी हैं. जितका तो चेहऱ्याने देखणा तितक्याच गोड गळ्याचा धनीही. या धनवान गायकाला ‘याचि देही, याचि डोळा’ गाताना पाहण्यासाठी हजारो नागपूरकर रसिकांनी शुक्रवारी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात तूफान गर्दी केली होती. इकडे मावळतीला क्षितिजावर केशरी उधळण होत असताना तिकडे संकुलात चकाकणाऱ्या दिव्यांनी असंख्य रंगांचा गालिचा अंथरला होता अंकितच्या स्वागताला. निवेदिकेने वर्दी दिली... प्राण डोळ्याशी आले...अन् अचानक ड्रम, सिंथेसायझर, तबला, गिटार सारे एकाच तालात वाजायला लागले...वाद्यांच्या या अखंड निनादात खास ‘रेट्रो स्टाईल’ ड्रेस घातलेला कानपूरचा छोरा अंकित तिवारी मंचावर आला आणि नागपूरकरांच्या जल्लोषात नुसता न्हाऊन निघाला. निमित्त होते लोकमत सखी मंचच्या संस्थापक आणि संगीतसाधक ज्योत्स्ना दर्डा यांच्या स्मृतिनिमित्त लोकमत मीडिया ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ च्या वितरण समारंभाचे. या समारंभाला अंकितच्या लाईव्ह परफॉर्मन्सने स्वरांकित करून टाकले. काहीसा रुमानी आणि काहीसा सुफियाना स्वभाव लाभलेल्या अंकितने पहिलेच गाणे त्याच्या स्वभावाला अनुकूल असे गायले. तेरे होने सेही मेरा होना हैं...ही त्याची पहिली प्रस्तुती होती. श्रोते या संमोहनातच कैद असताना अंकितने विचारले....हाय नागपूर कैसे हो? या आवाजाने तंद्री सुटली अन् रसिकांनी टाळ्यांच्या गजरात अंकितचे पुन्हा एकदा ‘ग्रॅण्ड वेलकम’ केले. पुढे जरासी दिल मे दे जगह तू...ऐ कबिरा मान जा...देख लेना तेरे ओठो मे...ही गोड गीते सलग सादर केली. अच्छा चलता हूं...जग घुमिया तेरे जैसा कोई...पिया रे पिया रे...हे गाणे अंकितच्या तोंडून ऐकणे म्हणजे अवर्णनीयच अनुभव ठरला. पुढे नागपूरकरांनी एका सुरात सून रहा है ना तू... या गाण्याची फर्माईश केली अन् या गाण्याने माझे आयुष्य बदलले़,असे सांगत अंकितने अगदी जोशात ही फर्माईश पूर्ण केली. गलिया गलिया...या गाण्यालाही श्रोत्यांचा तूफान प्रतिसाद लाभला.
पल्लवी... माफ कर देना
सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यात अंकित एकटा आला नव्हता तर त्याची नववधू पल्लवी त्याच्यासोबत होती. काही दिवसांपूर्वीच अंकित पल्लवीसोबत लग्नबंधनात अडकला. लग्नानंतर अंकितचा हा पहिला लाईव्ह कॉन्सर्ट होता. तो त्याची पत्नी पल्लवीसमोर पहिल्यांदा गात होता. त्यामुळे काही चुकले तर पल्लवी मला प्लीज माफ करशील, असे अंकित म्हणाला अन् त्याच्या या वाक्यासोबतच एकीकडे श्रोत्यांच्या प्रचंड टाळ्या पडल्या तर दुसरीकडे पल्लवीच्या ओठांवर लाजरे हसू फुलले.
आईच्या संगीतप्रेमातूनच पुरस्काराची संकल्पना : देवेंद्र दर्डा
सूर ज्योत्स्ना पुरस्काराचे हे पाचवे वर्ष असून ही एक सुरुवात आहे. अजून बराच लांब पल्ला गाठायचा आहे. आईच्या संगीतप्रेमातूनच आम्हाला या पुरस्कारांची संकल्पना सुचली. तसे पाहिले तर ज्योत्स्ना दर्डा या सर्वसाधारण महिलांसारख्याच होत्या. परंतु आत्मियतेने सर्वांना आपलेसे करून घेण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या जवाहरलाल दर्डा संगीत अकॅडमीतील विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्व गाजवीत आहेत. आतापर्यंत जितक्याही संगीतसाधकांना ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ मिळाले त्यांनीदेखील आंतरराष्ट्रीय मंचावर सादरीकरण केले आहे. ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ देण्यासाठी आम्हाला सातत्याने तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले. प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, संगीत तज्ज्ञ शशी व्यास हे तर स्थायी परीक्षक आहेतच. परंतु हरिप्रसाद चौरसिया, शंकर महादेवन, हरिहरन, प्रीतम, कैलाश खेर यांनीदेखील या पुरस्कारासाठी परीक्षण केले. विशेष म्हणजे ज्योत्स्ना दर्डा या वहिदा रहमान यांच्या चाहत्या होत्या. ‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ सोहळ्याला स्वत: वहिदा रहमान उपस्थित असल्यामुळे एकप्रकारे स्वप्नपूर्तीच होत असल्याची भावना ‘लोकमत मीडिया प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी व्यक्त केली.
नवीन विचारांतून पर्यावरण संवर्धन
यावेळी ‘सपट’ समूहाचे ‘सीईओ’ निखील जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ सोहळ्याशी जुळल्यानंतर हे दुसरे वर्ष आहे. यासाठी ‘लोकमत’चे आभारच मानावे लागतील. ‘सपट’ समूहाने १२० वर्षे पूर्ण केली आहेत. संगीताची जादू आजच्या काळातदेखील कायम आहे. संगीताने सर्वांना येथे खेचून आणले आहे. संगीताच्या सान्निध्यात पर्यावरणाचे सौंदर्य आणखी खुलते. परंतु गेल्या काही काळापासून पर्यावरणच धोक्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी नवीन विचारांची आवश्यकता आहे. आम्हीदेखील यासंदर्भात पुढाकार घेतला आहे, अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
पंतप्रधानांचा ‘व्हीप’, तरीही गडकरींची उपस्थिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द पाळला व व्यस्त वेळापत्रक असूनदेखील कार्यक्रमस्थळी आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘व्हीप’ जारी करून महत्त्वाच्या बैठकीसाठी सर्व मंत्र्यांना बोलाविले होते. मात्र ‘लोकमत’वरील प्रेमापोटी गडकरी यांनी नागपुरात येऊन थेट कार्यक्रमस्थळ गाठले, अशी माहिती ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी दिली.
हाऊसफुल्ल गर्दी
‘सूर ज्योत्स्ना पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी विभागीय क्रीडा संकुल ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. कलाकारांच्या सादरीकरणाला नागपूरकरांनी भरभरून साद दिली. संपूर्ण परिसरात प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळी मैदानात हजारो लोक एकत्र झाले होते.
मोबाईल ‘फ्लॅश’ने चकाकले सभागृह
कलाकारांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागपूरकरांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. सर्वांच्या हाती स्मार्ट फोन असल्याने प्रत्येक जण या कलावंतांना आपल्या मोबाईल कॅमेºयात कैद करण्याच्या प्रयत्नात होता. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर कॅमेºयांचे फ्लॅश चकाकायला लागले. इतक्या गर्दीतही स्टेजवरील कलावंतासोबत दुरून का होईना आपण कसे दिसू यासाठी तरुणाईचे सेल्फी काढणे सुरू होते. सभागृहात बराच वेळ तरुणाईचे फ्लॅश चकाकत राहिले. हे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकारांचे विरुद्ध दिशेने कॅमेºयाचे ‘फ्लॅश’देखील चकाकले.
अंजलीच्या ‘क्लासिक’ सुरांनी जिंकले
झी युवा वाहिनीच्या संगीत सम्राट शोमध्ये आपल्या जादुई आवाजाने विजेतेपदावर मोहोर उमटविणारी नगरची कन्या अंजली गायकवाड ही सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०१८ ची एक मानकरी ठरली. या समारंभात तिचेही सुरेल सादरीकरण झाले. दिल की तपीश...हे शास्त्रीय रागावर आधारित बंदिश इवल्याशा अंजलीने अतिशय ताकदीने सादर केली. या गीतानंतर अंजलीची थोरली बहीण नंदीनीही मंचावर आली आणि या दोन्ही गुणी बहिणींनी दंगल चित्रपटातील बापू सेहत की लिये तू तो हानिकारक हैं...हे गीत प्रचंड टाळ्यांच्या गजरात सादर केले. विजय दर्डा यांच्या खास आग्रहास्तव अंजलीने पिया...हा आलाप सादर केला. वहिदा रहमान यांच्या सन्मानार्थही तिने तू चंदा मै चांदनी...हे गीत गायले.
ब्रजवासी ब्रदर्सच्या सप्तसुरांची जुगलबंदी
कृष्णाच्या मथुरेत जन्मलेल्या या चारही भावांच्या आवाजात कृष्णाच्या बासरीइतकाच गोडवा आहे. तो गोडवा या समारंभात
नागपूरकरांनीही अनुभवला. हेमंत, अजय, होशियार आणि चेतन ब्रजवासी विशिष्ट वेशभूषेत मंचावर आले. बाकेंबिहारीचा जयकारा करीतच त्यांनी शास्त्रीय संगीतातील सप्तसुरांची अनोखी जुगलबंदी सादर केली. मोहब्बत बरसा देना तू....मुस्कुराने की वजह तूम हो...या त्यांच्या गीतांनीही माहोल केला. छोट्या चेतनच्या आवाजातील दिल का मामला हैं दिलबर... हे गीत तर निव्वळ अप्रतिम झाले. या भव्य कार्यक्रमात आपल्या मुलांना गाताना पाहून त्यांचे वडील हुकूम ब्रजवासी यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी जवाहरलाल दर्डा संगीत कला अकादमीच्या विद्यार्थ्यांचे संगीतमय सादरीकरण झाले.

आपुलकीतून ज्योत्स्ना दर्डा यांनी जोडले लोक : नितीन गडकरी

अव्याहत संगीतसाधना हे एकप्रकारचे व्रत करण्यासारखेच आहे. ज्योत्स्ना दर्डा यांनी आयुष्यभर संगीताची साधना केली अन् नवीन चेह:यांना मंच प्रदान करण्यासाठी सदैव पुढाकार घेतला. ज्योत्स्ना दर्डा यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय नम्र व शालीन होते. त्यांनी आपुलकीतून समाजाच्या सर्वच स्तरांतील लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडले होते. विजय दर्डा आणि सुरेश जैन या दोघांशीही माङो घनिष्ठ संबंध राहिले आहेत. त्यामुळे ज्योत्स्ना दर्डा यांच्याशी तर माङो सासर व माहेर असे दोन्ही बाजूंनी नाते होते. ‘लोकमत’चा वटवृक्ष वाढत असताना त्यांनी विजय दर्डा यांना नेहमी सोबत दिली. संगीतावर त्यांनी प्रेम केले. त्यांची जागा कधीच भरून निघू शकत नाही, पण संगीतरूपाने त्या आजही सर्वामध्ये आहेत. उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देणो व महिला सशक्तीकरण करणो हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

युवा कलाकारांना मिळाला हक्काचा मंच : देवेंद्र फडणवीस


ज्योत्स्ना दर्डा यांनी समाजातील सखींना एकत्र आणले व महिला सक्षमीकरणाचा नारा बुलंद केला. एकीकडे वंचितांसाठी काम करीत असताना स्वरसाधनादेखील सुरू ठेवली  युवा संगीतसाधकांना संधी देण्यासाठी धडपड केली. त्यांच्यामुळेच आज नवीन कलाकारांना हक्काचा मंच मिळाला आहे. या माध्यमातून नवीन लोकांना दिशा मिळत आहे; सोबतच सखी मंचच्या माध्यमातून ज्योत्स्ना दर्डा यांनी महिलांमध्ये एक आत्मविश्वास जागृत करण्याचे मौलिक कार्य केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

 

Web Title: Nagpuri Jhalloshala Kanpuri Tadka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.