नागपूरकर गारठले : दिवसासह रात्रीचेही तापमान खालावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:38 PM2020-01-20T23:38:09+5:302020-01-20T23:40:24+5:30
मागील २४ तासांपासून तापमानाचा पारा बराच खालावल्याने नागपूरकर गारठले आहेत. रात्रीसारखेच दिवसाही तापमान खालावलेले असून, विदर्भातून सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील २४ तासांपासून तापमानाचा पारा बराच खालावल्याने नागपूरकर गारठले आहेत. रात्रीसारखेच दिवसाही तापमान खालावलेले असून, विदर्भातून सर्वाधिक थंडीची नोंद नागपुरात करण्यात आली आहे.
मागील ३६ तासांपासून आकाश आभ्राच्छादित आहे. रविवारी सकाळी शहरात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आकाशात दाटलेले ढग सोमवारी दिवसभर कायम होते. यामुळे वातावरणात गारवा पसरला असून, तापमानही बरेच खालावले आहे. नागपूरचे तापमान विदर्भात सर्वात कमी नोंदविले गेले. मागील २४ तासांमध्ये किमान तापमान घटून ११ अंश सेल्सिअसवर पोहचले. तर कमाल तापमान सामान्यापेक्षा ७ अंशाने घसरून २२ अंश सेल्सिअवर पोहचले.
वेधशाळेने दिलेल्या सूचनेनुसार, पुढील २४ तासात आकाशात ढग दाटलेले राहतील. तापमानही सामान्यापेक्षा खालावलेले असेल. यामुळे थंडी वाढण्याची शक्यता आहे. नागपुरात मागील २४ तासात दिवसाच्या तापमानात २.५ व रात्रीच्या तापमानात ३.६ अंश सेल्सिअसची घसरण नोंदविण्यात आली आहे. तर ढगांमुळे आर्द्र्रता ७२ वरून ७४ टक्के नोंदविली गेली आहे.
याशिवाय ब्रह्मपुरीमध्ये १२.४, गोंदियात १२.५, अमरावती १२.८, अकोला-बुलडाण्यात १३.५, वर्धा १३.६, गडचिरोली १४, यवतमाळात १४.४ आणि वाशिममध्ये १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.