मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरकर धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:34 AM2018-07-17T00:34:05+5:302018-07-17T00:34:52+5:30

उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पण शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार असून त्यांची दहशत कायम असून, नागरिकांचा जीव धोक्यात आहे.

Nagpurian is in Danger due to stray dogs | मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरकर धोक्यात

मोकाट कुत्र्यांमुळे नागपूरकर धोक्यात

Next
ठळक मुद्देमहापौर-आयुक्तांनी रात्री रस्त्यावर फिरावे : दर मिनिटाच्या अंतरावर दिसतात कुत्री

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आलेली आहे. सरकार शहरात असल्याने काही प्रमाणात गुन्हेगारीला आळा बसला आहे. एवढेच नव्हे तर विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्पुरता बंदोबस्त करण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे. पण शहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्तसंचार असून त्यांची दहशत कायम असून, नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
रात्रीला कामावरून घरी परतणाऱ्यांच्या कुत्र्यांच्या टोळ्यांकडून हल्ला करण्याच्या घटना वाढल्या आहेत. पावसामुळे यात अधिकच भर पडली आहे. दुचाकी वाहन दिसले की कुत्री धावतात. यामुळे अनेकदा अपघात होऊन वाहन चालक जखमी होतात. वेळप्रसंगी जीव जाण्याचा धोका असतो. घरातील कमावती व्यक्ती अपघातग्रस्त झाली तर कुटुंबाचे काय होणार, याचाही विचार महापालिका प्रशासन चालविणाºयांच्या डोक्यात येत नाही. महापौर व आयुक्तांनी रात्रीला शहरातील रस्त्यांवरून फेरफटका मारला तर दर मिनिटाच्या प्रवासानंतर मोकाट कुत्र्यांची दहशत कशी असते, याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही.

राजभवन परिसर असुरक्षित
शहरात वर्षाला कुत्र्यांनी चावा घेण्याच्या आठ हजार घटना घडतात. यात अनेक जण गंभीर जखमी होतात. कुत्र्यांमुळे अपघात होऊन जखमी होणाºयांची संख्या याहून अधिक आहे. राजभवन हा सुरक्षित परिसर मानला जातो. परंतु मोकाट कुत्र्यांमुळे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाºयांसाठी हा परिसर सुरक्षित नाही. काटोल रोड, गिट्टीखदान पोलीस स्टेशनचा परिसर, गोरेवाडा रोड, बोरगाव, जुना काटोल नाका, तेलंगखेडी तलाव, पांढराबोडी, मेडिकल परिसर, बैद्यनाथ चौक, इमामवाडा, मानेवाडा रोड, भांडेवाडी, ताजबाग, नारा, नारी, पारडी नाका, रिंगरोड नरेंद्रनगर, उदयनगर, दिघोरी, सक्करदरा, कामठी रोड, हिंगणा रोड, प्रतापनगर यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्रीला मोकाट कुत्र्यांचा वावर असतो.

विधानभवन परिसरात यंत्रणा; शहराचे काय?
अधिवेशनासाठी आलेल्या मुंबईच्या पाहुण्यांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी विधानभवन परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेने विशेष पथक तैनात केले आहे. पण शहरातील नागरिकांना होणाºया त्रासाचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. विधानभवन परिसरासाठी विशेष पथक तैनात केले जाते. त्याच धर्तीवर शहराच्या विविध भागात पथक तैनात का केले जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मनपा प्रशासनाची बघ्याची भूमिका
मोकाट कुत्र्यांना आळा घालण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. याची जाणीव महापालिका प्रशासनालाही आहे. मात्र मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नाही. बेवारस कुत्र्यांवर नसबंदी होण्याची गरज आहे. यासाठी दोन वर्षात अनेकदा प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. परंतु नियोजनाचा अभाव, महापालिका प्रशासन व पदाधिकाºयांनी बघ्याची भूमिका यामुळे मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून आपली सुटका कोण करणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

जखमींची जबाबदारी घेणार का?
कुत्र्यांवरील नसबंदीसाठी कालावधी निश्चित करण्याची गरज आहे. चार ते पाच वर्षात ही प्रक्रिया पूर्ण करावयाची असेल तर दररोज १२५ ते १५० च्या आसपास शस्त्रक्रिया होण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा महापालिकेने उपलब्ध करण्याची गरज आहे. शहरातील चार भागात केंद्र सुरू करावे. नसबंदी केंद्रात सर्व सुविधा असाव्यात. प्रशिक्षित पशुवैद्यकीय अधिकारी असावेत. तरच हा उपक्रम यशस्वी होईल. परंतु महापालिक ा प्रशासनाकडे तूर्त असा प्रस्ताव नाही. त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त होईपर्यंत महापालिका कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची जबाबदारी घेणार आहे का, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.

 

Web Title: Nagpurian is in Danger due to stray dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.