नागपुरी घरफोड्यांची बेलतरोडी पोलीस ठाण्याला अशीही सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 08:59 PM2018-01-29T20:59:12+5:302018-01-29T21:03:23+5:30
बंद दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरून नेली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे चोरट्यांनी ही घरफोडी करून पोलिसांना सलामी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बंद दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरून नेली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू असताना तिकडे चोरट्यांनी ही घरफोडी करून पोलिसांना सलामी दिली.
बेलतरोडीतील जगचंद्रनगरात नीळकंठ पांडुरंग बारई (वय ५८) यांचे निवासस्थान आहे. रविवारी सकाळी ते आपल्या दाराला कुलूप लावून बाहेर गेले. दुपारी परत आले असता त्यांना दाराचे कुलूप तुटून दिसले. घरात पाहणी केली असता सर्व साहित्य अस्तव्यस्त होते. चोरट्यांनी बारई यांच्या कपाटात असलेले रोख २५ हजार, सोन्याचांदीचे दागिने आणि हातघड्याळ असा सुमारे एक ते दीड लाखांचा ऐवज लंपास केला. बारई यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडीचे सहायक निरीक्षक रमेश चहारे यांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, रविवारी सायंकाळी बेलतरोडी पोलीस ठाण्याचे मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केले आणि त्याच्या काही तासानंतरच हा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी जुन्या बाजारभावाप्रमाणे चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत ९८ हजार रुपये लावली आहे.