नागपूरकर वैज्ञानिकाने दिले ‘आईनस्टाईन’च्या सिद्धांताला आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 09:55 AM2018-02-28T09:55:26+5:302018-02-28T09:55:35+5:30

आईनस्टाईनचा सिद्धांत पुराव्यासकट खोडून काढण्याचा दावा एका भारतीय आणि तेही नागपूरकर वैज्ञानिकाने केला आहे. होय, डॉ संजय वाघ हेच ते वैज्ञानिक ज्यांनी आईनस्टाईनचा सिद्धांत खोडून नवा सिद्धांत जगासमोर मांडला आहे.

Nagpurian scientist challenged Einstein's theory of relativity | नागपूरकर वैज्ञानिकाने दिले ‘आईनस्टाईन’च्या सिद्धांताला आव्हान

नागपूरकर वैज्ञानिकाने दिले ‘आईनस्टाईन’च्या सिद्धांताला आव्हान

Next
ठळक मुद्देसापेक्षतावादाचा सिद्धांत खोडल्याचा दावा

निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अल्बर्ट आईनस्टाईन म्हणजे विज्ञानातील सर्वात मोठे वैज्ञानिक म्हणून गणना होणारे नाव. जगभरातील लोकांच्या बुद्धिमापनाची तुलना करताना आईनस्टाईन हेच प्रमाण. त्यांनी मांडलेला सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांतावरच विश्वातील पदार्थांच्या घडामोडी चालत असल्याच्या दाव्याला जगात मान्यता आहे. या सिद्धांताला आतापर्यंत जगात अनेकांनी आक्षेप घेतला असला तरी कुणीही पुराव्यानिशी ते सिद्ध करू शकलेले नाही. मात्र आईनस्टाईनचा सिद्धांत पुराव्यासकट खोडून काढण्याचा दावा एका भारतीय आणि तेही नागपूरकर वैज्ञानिकाने केला आहे. होय, डॉ संजय वाघ हेच ते वैज्ञानिक ज्यांनी आईनस्टाईनचा सिद्धांत खोडून नवा सिद्धांत जगासमोर मांडला आहे.
डॉ. वाघ यांचे संशोधन समजण्यापूर्वी आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत समजणे महत्त्वाचे ठरेल. यालाच ‘जनरल थिएरी आॅफ रिलेटीव्हिटी’ असेही म्हटले जाते. आईनस्टाईन यांनी सन १९१६ मध्ये मांडलेला नियम सामान्य भाषेत मांडायचा झाल्यास ‘निरीक्षण करणारा स्तब्ध किंवा गतिमान असेल, त्याचा भौतिकशास्त्राच्या नियमावर परिणाम होत नाही किंवा भौतिकशास्त्राचे नियम हे कुणीही निरीक्षण करणारा असेल, त्याला सारखेच लागू होतात’, असे करता येईल. या सिद्धांताच्या आधारावरच विश्वात चालणाऱ्या घडामोडी सुरू आहेत. या सिद्धांताला १०० वर्षांपासून मान्यता असून कुणीही आक्षेप घेतलेला नाही. मात्र आईनस्टाईन यांनी सिद्धांत मांडताना जे गणितीय (मॅथमॅटिकल फॉर्म्युला) सूत्र सादर केले, त्यावर मात्र अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. खुद्द आईनस्टाईन यांना हे सूत्र खटकल्याने त्यांनी ते बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या नोंदी नमूद आहेत. त्यामुळे आईनस्टाईनचा सिद्धांत कालसापेक्ष आहे, हा निष्कर्ष गैरलागू ठरला. मात्र हे आक्षेप गणितीय सूत्रात आजतागायत कुणाला सिद्ध करता आलेले नव्हते.
डॉ. संजय वाघ यांनी मात्र नवीन सूत्र सादर करून हा सिद्धांत खोडून काढण्याचा दावा केला आहे. डॉ. वाघ यांच्यानुसार डॉप्लर इफेक्ट किंवा इतर घडामोडींचा आईनस्टाईनच्या सूत्रानुसार अभ्यास करताना हा सिद्धांत सिद्ध करता येत नाही. अभ्यास करताना ही अडचण नेहमी जाणवत होती. त्यावर संशोधन करून नवीन सूत्राचा सिद्धांत मांडल्याचा दावा त्यांनी केला. सामान्य गणित आणि सामान्य भौतिकशास्त्र याची सांगड घालून हे सूत्र मांडल्याचे त्यांनी सांगितले. या सिद्धांताला त्यांनी ‘कॅटेगरी थिएरी’ किंवा ‘वैश्विक सापेक्षतावाद’ म्हणजे युनिव्हर्सल थिएरी आॅफ रिलेटीव्हिटी असे संबोधले आहे. आईनस्टाईन एक महान वैज्ञानिक आहेत, यात तिळमात्र शंका नाही व आज ते हयात असते तर त्यांनीही आपल्या सिद्धांताचा स्वीकार केला असता, असा विश्वास डॉ. वाघ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

डॉ. वाघ व त्यांचा सिद्धांत
डॉ. संजय मोरेश्वर वाघ हे सध्या सेन्ट्रल इंडिया रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून कार्य करीत आहेत. नागपुरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय कॉस्मालॉजी परिषदेमध्ये डॉ. वाघ यांनी त्यांचा सिद्धांत सादर केला. त्यांनी सापेक्षवादावर लिहिलेल्या ‘सब्टल्टी इन रिलेटीव्हिटी’ या पुस्तकात हे संशोधन सविस्तरपणे मांडले आहे. त्यांचे संशोधन जगभरात मान्यता असलेल्या ‘सायन्स जनरल’ मध्येही प्रकाशित झाले आहे. त्यांनी मॉस्को, रशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपले संशोधन मांडले होते.

सापेक्षतावाद व विश्वाचा विनाश
जनरल सापेक्षवादाच्या सिद्धांतानुसार भविष्यात एखादा विस्फोट होऊन ही संपूर्ण गॅलेक्सी नष्ट होईल असा दावा केला जातो. बिग बँगचा सिद्धांतही त्यावरच मांडला गेला आहे. डॉ. वाघ यांनी मात्र हा दावा फेटाळला आहे. त्यांच्या वैश्विक सापेक्षवादानुसार गॅलेक्सीमधील सौरमाला, तप्त वायूचे गोळे हळूहळू थंड होत जातील आणि सगळ्या पदार्थांची गती थांबेल. हा दावा थर्मोडायनॅमिक्सच्या सिद्धांताप्रमाणे असून डॉ. वाघ यांनी याला कोल्ड डेथ असे संबोधले आहे. पुढे एखाद्या पदार्थामध्ये हालचाल होऊन पुन्हा विश्वाच्या निर्मितीला सुरुवात होईल, असेही ते सांगतात. ‘विश्वाला सुरुवात नाही व अंतही नाही’, हा जयंत नारळीकरांचा सिद्धांतही त्यावरच अवलंबून आहे.

Web Title: Nagpurian scientist challenged Einstein's theory of relativity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthपृथ्वी