युद्धाच्या चटक्यांनी होरपळले, पण ‘फिनिक्स’ झेप घेणार! नागपूरकर वैज्ञानिकाचा अनोखा मानस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2022 08:30 AM2022-04-06T08:30:00+5:302022-04-06T08:30:02+5:30
Nagpur News मूळचे नागपूरकर व युक्रेनमध्ये १७ वर्षे स्थानिक राहिलेले ‘एरोस्पेस’ संशोधक राजेश मुनिश्वर यांनी विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये ‘एरोस्पेस स्टार्टअप कल्चर’ व संशोधनवृत्ती जागविण्याचे ध्येय घेऊन शून्यातून नवीन सुरुवात करण्याचा संकल्प घेतला आहे.
योगेश पांडे
नागपूर : संशोधनाच्या सर्व सोयी-सुविधा, बुद्धिमत्तेचा होणारा सन्मान, मिळणारा पैसा आणि आदर, भविष्यात यशाची आणखी शिखरे गाठण्याच्या मोठ्या संधी...सर्व काही अगदी स्वप्नवत सुरू असताना अचानक युद्धाचा ‘बॉम्बगोळा’ पडला अन् मूळचे नागपूरकर व युक्रेनमध्ये १७ वर्षे स्थानिक राहिलेले ‘एरोस्पेस’ संशोधक राजेश मुनिश्वर यांनी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांतून उभ्या केलेल्या सर्व गोष्टी काही दिवसांतच अक्षरश: मातीमोल झाल्या. आता सर्वच संपले अशी अनेकांची भावना होती, मात्र रशियन मिसाईल्सचे चटके त्यांच्या जिद्दीला डगमगवू शकले नाहीत. ‘हार नहीं मानूंगा’ हा बाणा कायम ठेवत १७ वर्षांनी मायभूमी गाठली आणि विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये ‘एरोस्पेस स्टार्टअप कल्चर’ व संशोधनवृत्ती जागविण्याचे ध्येय घेऊन शून्यातून नवीन सुरुवात करण्याचा संकल्पच घेतला.
राजेश मुनिश्वर १७ वर्ष युक्रेनमध्ये होते व त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय प्रकल्पांसोबतच ‘एअरोस्पेस’ क्षेत्रात काम केले. युद्धामुळे कुटुंबासह परतल्यानंतर देशातल्या मोठ्या शहरांमध्ये त्यांनी स्टार्टअप किंवा वैज्ञानिकपदासाठी प्रयत्न करावे, असे त्यांना सल्ले मिळाले. मात्र, विदर्भातील विद्यार्थ्यांमध्ये क्षमता व आवड असूनदेखील त्यांना ‘एरोस्पेस’ क्षेत्रात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. सद्य:स्थितीत या क्षेत्रासाठी सर्वसुविधांनी युक्त असलेला ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध नसला तरी विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविली तर ते या क्षेत्रात भरारी घेऊ शकतात हे त्यांनी त्यांच्याशी केलेल्या संवादातून जाणले. यातूनच शहरातील महाविद्यालयांशी ‘टाय अप’ करून यादृष्टीने एक वैज्ञानिक ‘ॲप्रोच’ विकसित करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाने त्यांच्यासोबत काम करण्याची तयारी दाखविली आहे हे विशेष.
स्वस्थ बसणे जमतच नाही
युक्रेनची राजधानी कीव्हमधील माझे अनेक सहकारी त्यांच्या मायदेशी सुखरुपपणे पोहोचले आहेत. मात्र अनेक जण हताश झाले आहेत. काही काळ माझीदेखील तशी अवस्था होती. मात्र, स्वस्थ बसणे हे वैज्ञानिकाला जमू शकतच नाही. पुढील काही काळ विद्यार्थ्यांमधूनच भविष्यातील ‘एरोस्पेस’तज्ज्ञ बनविण्यावर भर असेल असेल राजेश मुनिश्वर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यासंदर्भात गुरुनानक इन्स्टिट्यूटसमवेत स्पेस लॉंच स्टार्टअप प्रकल्पावर काम करणार आहे. त्यात देशातील नामांकित वैज्ञानिकदेखील जुळणार असून नॅनो सॅटेलाईट लॉंच व्हेईकल रॉकेट तयार करण्यात येईल. अंतिम वर्षाचे विद्यार्थी व प्राध्यापकदेखील या प्रकल्पात सहभागी होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.