नागपूरकर तरुणांनी पादाक्रांत केले ३३ किल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:57 PM2019-04-08T22:57:37+5:302019-04-08T23:00:06+5:30
सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, कडे कपाऱ्यात अनेक गड आजही ताठ मानेने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत उभे आहेत. राकट अशा सह्याद्रीतील अफाट, बेलाग गडकोट म्हणजे इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अतुट नाते सांगणारे अनमोल रत्न होत. महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात दडलेल्या गडकोटांच्या या इतिहासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत नागपूरच्या दोन तरुणांनी ३३ किल्ले पादाक्रांत करण्याची कामगिरी बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, कडे कपाऱ्यात अनेक गड आजही ताठ मानेने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत उभे आहेत. राकट अशा सह्याद्रीतील अफाट, बेलाग गडकोट म्हणजे इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अतुट नाते सांगणारे अनमोल रत्न होत. महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात दडलेल्या गडकोटांच्या या इतिहासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत नागपूरच्या दोन तरुणांनी ३३ किल्ले पादाक्रांत करण्याची कामगिरी बजावली.
किल्लेप्रेमी विशाल देवकर आणि अभिषेक सावरकर अशी या दोन तरुणांची नावे. विशाल हा दुर्गप्रेमी म्हणून प्रसिद्ध असून शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांची निर्मिती करणे हा त्याचा छंद आहे. हे दुर्गप्रेम त्याला स्वस्थ बसू देत नाही. या निर्मितीसाठी त्याने गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. यावेळी मात्र मोठे आव्हान त्याने स्वीकारले. विशाल व त्याचा मित्र अभिषेक मोटरसायकलवर स्वार होऊन २४ मार्च रोजी नागपूरहून या गडकोटांच्या भेटीसाठी निघाले. या १३ दिवसात तब्बल ३६०० किलोमीटरचा प्रवास करीत या दोघांनी ३३ किल्ले व प्रेरणास्थळे पालथी घातली. जिजाऊंचे जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा, देवगिरीचा किल्ला, सर्वाधिक उंचीवर असलेला साल्हेरचा किल्ला असे अनेक गडकोट पादाक्र ांत केले. याशिवाय त्यांनी अनेक लेणी, ऐतिहासिक वाडे, पुरातन मंदिरे अशा स्थळांनाही भेटी दिल्या. नागपुरातून सुरू झालेला प्रवास बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, पुणे असा होत पुन्हा नागपूरला पूर्ण झाला. या मोहिमेत या साहसी दुर्गप्रेमींचे अनेक ठिकाणी स्वागत व सत्कार झाले.
नागपुरात सुखरूप पोहचल्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने महाल येथे विशाल व अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला. विशाल म्हणाला, या मोहिमेदरम्यान अनेक अनुभव घेता आले. विविध गावात आणि पाड्यावर रात्रीचा मुक्काम केला. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो पण पर्यटकांमुळे या ऐतिहासिक गडकोटांचे नुकसानही होत असल्याची खंत त्याने अधोरेखित केली. महाराष्ट्रातील विविध भागात राहणाºया लोकांचे जीवन या मोहिमेतून अनुभवता आल्याचे मनोगत त्याने व्यक्त केले.