आशा भोसले यांच्या सन्मानामुळे नागपूरकरांना आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:10 AM2021-03-26T04:10:51+5:302021-03-26T04:10:51+5:30
नागपूर : शब्दांना स्वरसाज चढवून काव्याचे सोने करणाऱ्या आणि सुमधूर आवाजाने मन आणि कान तृप्त करणाऱ्या आशा भोसले यांना ...
नागपूर : शब्दांना स्वरसाज चढवून काव्याचे सोने करणाऱ्या आणि सुमधूर आवाजाने मन आणि कान तृप्त करणाऱ्या आशा भोसले यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार असल्याच्या घोषणेमुळे नागपूरकरांना आनंद झाला आहे. मुंबईत ही घोषणा होताच, नागपुरात त्याचे आनंददायी पडसाद उमटले. अनेक स्वररसिकांनी आणि चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव केला.
मंगेशकर कुटुंब आणि नागपूरकर यांचा स्नेहाचा संबंध राहिला आहे. अनेकदा मंगेशकर कुटुंब नागपुरात आले आहे. राज्य सरकारने यावर्षी हा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर करून सुमधुर आवाजाचा गौरव केला. त्यांचा हा सन्मान सोहळा नागपुरातच विधानभवन परिसरात व्हावा, अशी आग्रही मागणी आता नागपूरकरांकडून व्हायला लागली आहे.
मंगेशकर कुटुंबाचे आणि शेवाळकर परिवाराचे स्नेहाचे नाते आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर नागपुरात आले की शेवाळकर यांच्याकडे थांबत असत. दरम्यान, नागपूरकरांचा गैरसमज दूर करण्यासाठी मंगेशकर कुटुंबीयांनी दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा २४ एप्रिल १९९८ ला नागपुरात घेतला. या सोहळ्याला सर्व मंगेशकर भावंडे हजर होती. नंतरच्या काळात लता मंगेशकर यांचा मनपाकडून सत्कार घेण्यात आला होता. कुंदाताई विजयकर, अटलबहादूर सिंग यांच्या पुढाकारात हा सोहळा व्हीसीए स्टेडियमवर झाला होता. त्यानंतर २०१६ मध्ये आशाताईंचा मनपाकडून सत्कार करून यशवंत स्टेडियमवर गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. २००५ मध्ये झालेल्या अमृत महोत्सव सत्काराला लतादिदी उपस्थित होत्या. नागपूरसोबत मंगेशकर कुटुंबाचे असलेल्या स्नेहाच्या नात्यामुळे या पुरस्काराची घोषणा येथील नागरिकांसाठी आनंददायी ठरली आहे.