नागपूरकरांची कच्च्या घाणीच्या तेलाला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:06 AM2020-12-07T04:06:17+5:302020-12-07T04:06:17+5:30
नागपूर : कोरोना संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. ...
नागपूर : कोरोना संसर्गामुळे अनेकांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तेलाच्या बाबतीत जर-तरच्या प्रश्नावर तोडगा काढत रिफाईंड तेलाच्या जागी लाकडी, कच्चे घाणीचे म्हणजे, कोल्ड प्रेसचे तेलाचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. या तेलात रसायनांचा व अग्नीचा वापर होत नसल्याने गुणकारी असल्याचे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
तेल हा स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक. पण आरोग्याचा विचार करता तेल अतिप्रमाणात खाणे, चुकीच्या पद्धतीने स्वयंपाकासाठी तेल वापरणे या सगळ्याच गोष्टी अपायकारक ठरतात. नागपुरात साधारण २० ते ३० वर्षांपूर्वी घाणीवरूनच तेल आणले जायचे. दरम्यानच्या काळात विविध कंपन्यांचे रिफार्ईंड तेल बाजारात आले. ते स्वस्त असल्याने घाणीच्या तेलाची मागणी घटली. परिणामी, अनेक घाण्या बंद पडल्या. सध्या कोरोनामुळे बहुसंख्य जनता ‘हेल्थ कॉन्शस’ झाली आहे. तेलाकडेही बारकाईने पाहत आहे. यामुळेच की काय, कच्चा घाणीच्या तेलाचा व्यवसाय नागपुरात जोरात सुरू आहे.
-काय आहे, कोल्ड प्रेसचे तेल
कोल्ड प्रेसचे तेलामध्ये तेलबिया निवडून स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात त्या लाकडी घाण्यावर दळल्या जातात. यात तेलबियांवर कुठलीही रासायनिक प्रक्रिया किंवा रसायनांचा वापर केला जात नाही. या प्रक्रियेत अग्नीचाही वापर होत नाही. कोल्ड प्रेसच्या पद्धतीने त्याचे उत्पादन होते. अन्य प्रक्रियायुक्त तेल अनेक वेळा उष्ण होण्याचा प्रक्रियेतून गेले असते. यामुळे त्याचा गंध आणि चव काहीशी नाहीशी होते. परंतु कोल्ड प्रेसच्या तेलात आपण ज्या तेलबियांचे तेल काढतो त्यांचा गंध आणि चव कायम राहते.
-रसायनांचा वापर नसलेले तेल आरोग्यासाठी चांगले
आहार तज्ज्ञ मालविका फुलवानी या म्हणाल्या, आहारातून ‘ट्रान्स फॅटी अॅसिड्स’ पुरेसे मिळत असल्याने तेलाचा कमीत कमी वापर करायला हवा. लठ्ठपणा, हृदयरोग, पक्षाघाताच्या रुग्णांनी खाण्यात तेलाचे सेवन सर्वात कमी करायला हवे. रसायनांचा वापर नसलेले तेल आरोग्यासाठी कधीही चांगले. यामुळेच लाकडी, कच्च्या घाणीचे तेल गुणकारी म्हणून पाहिले जात आहे. वास्तविक पाहता मोहरीचे तेल, सूर्यफुलाचे तेल किंवा खोबरेल तेल अधिक गुणकारी आणि कमी सॅच्युरेटेड फॅट्स असणारे आहे. जोखीम आणि फायद्याची बाब म्हणजे शेंगदाणा तेल हे मधल्या श्रेणीत येते.
कच्च्या घाणीच्या तेलाच्या मागणीत हळूहळू वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टिकोनातून लोक या तेलाकडे पुन्हा वळायला लागले आहेत. हे तेल ब्रॅण्डेड तेलाच्या तुलनेत महाग आहे. परंतु यात रसायनांचा वापर होत नसल्याने व आरोग्यदायी वातावरणत ते काढले जात असल्याने आरोग्यदायी म्हणूनही पाहिले जात आहे.
-अमिकेत तराळे
कच्च्या घाणीचे व्यावसायिक