नागपूरकरांनी दिला मुख्यमंत्र्यांना उत्स्फूर्त जनादेश : महाजनादेश यात्रेचे शहरात दमदार स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 08:43 PM2019-08-02T20:43:56+5:302019-08-02T20:48:35+5:30
वर्धा येथून निघालेली महाजनादेश यात्रा शुक्रवारी शहरात पोहचली. नागपूरकरांनी कुठे फटाक्यांची आतषबाजी, कुठे पुष्पवर्षाव तर कुठे ढोलताशांच्या गजर करीत उत्स्फूर्तपणे जनादेश दिला. रस्त्याच्या दुतर्फा यात्रेच्या स्वागतासाठी जमलेल्या नागपूरकरांचे, मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्धा येथून निघालेली महाजनादेश यात्रा शुक्रवारी शहरात पोहचली. नागपूरकरांनी कुठे फटाक्यांची आतषबाजी, कुठे पुष्पवर्षाव तर कुठे ढोलताशांच्या गजर करीत उत्स्फूर्तपणे जनादेश दिला. रस्त्याच्या दुतर्फा यात्रेच्या स्वागतासाठी जमलेल्या नागपूरकरांचे, मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केले.
महाजनादेश यात्रा नागपुरात दाखल होताच ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात्रेचे स्वागत केले. यात्रेदरम्यान भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता. शेकडोच्या संख्येने दुचाकीवर कार्यकर्ते भाजपाचा झेंडा घेऊन यात्रेत सहभागी झाले होते. सोबतच डीजेचा दणदणाट होता. शहर अध्यक्ष प्रवीण दटके व ज्येष्ठ नेते संदीप जोशी हे रॅलीला कमान देत होते. यात्रेसाठी खास तयार करण्यात आलेल्या रथावरून मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस सर्वांना अभिवादन करीत होते. रथाच्या मागे पोलीस आणि पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा होता. दुपारी ३ वाजताच्या सुमारास यात्रा खापरीमध्ये पोहचली. भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करीत यात्रा विमानतळ चौक, छत्रपती चौक, व्हेरायटी चौक, संविधान चौक, छावणी, गिट्टीखदान होत काटोलकडे मार्गस्थ झाली. दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यात्रेच्या मार्गात लोकांनी मोठमोठे बॅनर्स, होर्डिंग लावले होते. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशांचा गजर होत होता. फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव होत होता. चौकाचौकात भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करीत होते.
दक्षिणच्या पदाधिकाऱ्यांनी केले छत्रपती चौकात स्वागत
महाजनादेश यात्रेच्या स्वागताची कमान दक्षिण नागपुरात आमदार सुधाकर कोहळे यांच्याकडे होती. दक्षिण नागपुरातील पदाधिकारी आणि नगरसेवकांनी छत्रपती चौकात यात्रेचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बलून सोडण्यात आले. मुख्यमंत्र्यांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. यावेळी आमदार विकास कुंभारे, माजी आमदार मोहन मते, डॉ. छोटू भोयर, संजय ठाकरे, विलास करांगळे, किशोर पेठे, सुनील मानेकर, प्रशांत कांबळे, मंगला खेकरे, दिव्या धुरडे, माधुरी ठाकरे, स्नेहल बिहारे, भारती बुंदे, स्वाती आखतकर, कल्पना कुंभलकर, रुपाली ठाकूर, शितल कांबळी, रिता मुळे, उषा पायलट, अभय गोटेकर, बळवंत जिचकार, रमेश सिंगारे, राजेंद्र सोनकुसरे, शशांक खेकरे, विनोद कडू आदी सहभागी झाले होते.
व्हेरायटी चौकात ढोलताशांचा गजर
ढोलताशांच्या गजरात व्हेरायटी चौकात महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यात आले. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठमोठ्या पुष्पमाळांनी स्वागत केले. तर संविधान चौकात बरिएएमच्या नेत्या अॅड. सुलेखा कुंभारे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
गिट्टीखदान चौकात उत्स्फूर्त स्वागत
गिट्टीखदान परिसरात मुख्यमंत्र्याच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी आमदार सुधाकर देशमुख, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, नगरसेविका डॉ. परिणिता फुके यांनी प्रचंड तयारी केली होती. जागोजागी होर्डिंग व कमानी उभ्या केल्या होत्या. जयप्रकाश गुप्ता, संदीप जाधव, संगीता गिऱ्हे, शिल्पा धोटे, प्रगती पाटील, डॉ. प्रशांत चोपडा, नवनित श्रीवास्तव, अशफाक खान, विजयसिंग ठाकूर, शरद तिवारी, निशांत गांधी, नरेश बरडे, सागर घाटोळे यांच्या उपस्थितीत पश्चिम नागपुरातील जनतेने यात्रेचे जोरदार स्वागत केले. तसेच छावणी चौकातही आमदार डॉ. मिलिंद माने, उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक यांच्या नेतृत्वात राम आसरे मिश्रा, अशोक शुक्ला, राजेश गौतम, संतोष दुबे, राजेश तिवारी, अंजू पांडे, शिल्पा तिवारी, गीता मिश्रा यांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले.
जनादेश मिळणारच
देशात झालेल्या कामाची पावती देशवासीयांनी परत नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवून दिली. आता राज्याची वेळ आहे. राज्यात कधी नव्हे एवढी विकासकामे झालेली आहे. प्रत्येक वर्गाच्या अपेक्षा सरकारने पूर्ण केल्या आहे. महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून पुन्हा जनतेचा जनादेश घ्यायचा आहे. महाराष्ट्रातील जनतेचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता, भाजपाला पुन्हा जनादेश मिळणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान घेतलेल्या छोटेखानी सभेतून व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
महाजनादेश यात्रेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले. नागपूरकरांचे प्रेम लक्षात घेता, शहर सोडताना मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद नागपूर असे टिष्ट्वट करून नागपूरकरांचे आभार मानले.