राष्ट्रीय युवा पुरस्काराने नागपूरकर सिद्धार्थचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 11:15 AM2021-08-13T11:15:27+5:302021-08-13T11:16:08+5:30
Nagpur News Siddharth Roy नागपूरकर युवा लेखक सिद्धार्थ रॉय याचा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने (२०१८-१९) गौरव करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरकर युवा लेखक सिद्धार्थ रॉय याचा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने (२०१८-१९) गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातून संबंधित वर्षासाठी सन्मानित झालेला तो एकमेव तरुण आहे. सिद्धार्थने शालेय जीवनापासूनच लेखन सुरू केले होते व या योगदानासाठी त्याला सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयातर्फे दरवर्षी समाजात सकारात्मक कार्य करणाऱ्या तरुण व सामाजिक संघटनांना राष्ट्रीय युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सिद्धार्थने ‘स्पेशल फिश’ व ‘राईज इन लव्ह’ या पुस्तकांतून युवा संस्कृती, कौटुंबिक जिव्हाळा यांसारखे विषय हाताळले आहेत. सिद्धार्थ हा नावाजलेला ब्लॉगरदेखील असून, लहान वयापासूनच तो विविध प्रसारमाध्यमांसाठी लेखन करतो. केंद्रीय युवा व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते त्याला नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रमाणपत्र व एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
१७ हजार विद्यार्थ्यांशी संवाद
सिद्धार्थ हा वक्तादेखील आहे. आतापर्यंत ५० हून अधिक व्याख्यान्यांच्या माध्यमातून त्याने १७ हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथेदेखील त्याला व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते.