नागपूरकर विद्यार्थ्याला भारत-बांगलादेश क्रिकेट सामन्यादरम्यान मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2022 10:09 PM2022-12-07T22:09:31+5:302022-12-07T22:18:46+5:30
Nagpur News प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी चालत चालत बांगलादेशला पोहोचलेल्या २० वर्षीय नागपुरकर विद्यार्थ्याला बांगलादेशमध्ये मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली.
योगेश पांडे
नागपूर : प्लास्टिकविरोधात जनजागृतीसाठी चालत चालत बांगलादेशला पोहोचलेल्या २० वर्षीय नागपुरकर विद्यार्थ्याला बांगलादेशमध्ये मारहाण झाल्याची घटना बुधवारी घडली. भारत-बांगलादेशदरम्यान मीरपूर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. रोहन अग्रवाल असे संबंधित विद्यार्थ्याचे नाव असून तेथील सुरक्षायंत्रणेने सहकार्य न केल्याने अखेर त्याने स्वत:च फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपबिती मांडली.
८ ऑक्टोबरपासून रोहन बांगलादेशमध्ये आहे. तेथे तो विविध ठिकाणी फिरून प्लास्टिकचे धोके व भविष्यातील दुष्परिणाम यांच्याबाबत जागृती करतो आहे. तो क्रिकेटचादेखील फॅन असून तो एकदिवसीय सामना पाहण्यासाठी बुधवारी मीरपूर येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर पोहोचला. त्याच्यासोबत त्याचे तेथील काही परिचितदेखील होते. सामन्यादरम्यान तो भारतीय संघाचे समर्थन करत होता. त्याचवेळी बांगलादेश समर्थकांनी त्याच्याशी वाद घातला व त्याला मारहाण केली. भारतासाठी घोषणा दिल्या तर जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. रोहनने याची तेथील सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली. मात्र त्याला कुणीच गंभीरतेने घेतले नाही. अखेर त्याने मैदानाबाहेर निघाल्यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण प्रकार मांडला. यासंदर्भात त्याने बांगलादेश येथील भारतीय दुतावासालादेखील कळविले आहे.
दोन महिन्यांपासून बांगलादेशमध्ये जागृती
मुळचा नागपुरकर असलेला रोहन हा सिक्कीम येथील विद्यापीठात शिक्षण घेत आहे. प्लास्टिकसंदर्भात जनजागृतीसाठी त्याने कोरोना काळापासून जागृती सुरू केली. सुमारे ६५० दिवसांत त्याने भारतातील २७ राज्यांचा प्रवास केला. ८ ऑक्टोबर रोजी तो बिलोनिया सीमेमार्गे बांगलादेशमध्ये दाखल झाला. तेथे विविध शैक्षणिक संस्था, विद्यापीठे इत्यादी ठिकाणी जाऊन तो जागृती करत आहे. अशा तरुणाला मारहाण झाल्याने सोशल मीडियावरदेखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.