‘क्लासिकल अँड बियॉण्ड’मध्ये नागपूरकर अनुभवणार झाकिर हुसेन यांच्या बोटांची जादू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 05:15 PM2022-11-24T17:15:50+5:302022-11-24T17:16:16+5:30
लोकमत नागपूर आवृत्तीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि बाबूजींच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजन
नागपूर : स्वातंत्र संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तबलावादक पद्मभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांची ‘क्लासिकल अँड बियॉण्ड’ ही संगीत सभा अनुभवण्याचा दुर्मीळ योग नागपूरकरांना येत आहे. लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम रविवारी ४ डिसेंबरला सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळात रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होत आहे.
या संगीत सभेत उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासह आंतरराष्ट्रीय ख्यातीचे व्हायोलिन वादकद्वय कुमारेश आणि गणेश, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तालवाद्यवादक व्ही. सेल्वागणेश तसेच मृदंगमच्या नादस्वरांमधून महाशिवाच्या दर्शनाची अनुभूती घडविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त मृदंगमवादक पत्री सतीश कुमार या दिग्गजांच्या कलाविष्कारातून साकारणारी नाद-स्वरांची आध्यात्मिक अनुभूती या कार्यक्रमातून येणार आहे.
बाबूजी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. तसेच लोकमत नागपूर आवृत्तीचेही सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त यंदा वर्षभर विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘क्लासिकल अँड बियॉण्ड’ या संगीत सभेचा हा योग आहे.