भारीच! कतारमधील फुटबॉल स्टेडियम उभारणीत नागपूरकराचाही ‘वाटा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 01:07 PM2022-11-23T13:07:00+5:302022-11-23T13:09:52+5:30
‘तेथे कर माझे जुळती’ : विश्वचषकाची अंतिम लढत याच मैदानावर होणार
नीलेश देशपांडे
नागपूर : ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’. बा. भ. बोरकरांच्या प्रसिद्ध कवितेची ही ओळ नागपूरकर अभियंत्याने कृतीत उतरविली. फिफा फुटबाॅल विश्वचषकाचे आयोजन होत असलेल्या कतारमध्ये भव्यदिव्य असे फुटबॉल स्टेडियम उभारणीत या अभियंत्याचा मोठा वाटा राहिला.
शाहीद अली असे या अभियंत्याचे नाव. ८० हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या राजधानी दोहा येथील लुसैल स्टेडियमच्या उभारणीवेळी त्यांनी सेवा दिली. आता याच मैदानावर १९ डिसेंबर रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. ‘लोकमत’शी संवाद साधताना शाहीद यांनी निर्धारित कालावधीत हे काम पूर्ण करताना किती आव्हाने आली, याचा ऊहापोह केला.
२०१७ ला मुंबईतील एका फर्मला बांधकामाचे कंत्राट मिळाले. १५-२० अभियंत्यांसह शाहीद अली यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली. फिफा विश्वचषकासाठी मोठ्या स्टेडियमचे बांधकाम हा माझ्यासाठी सर्वोत्तम अनुभव ठरला. हे काम मुदतीत पूर्ण झाल्याचा मला आनंद आहे. २०१७ ला काम सुरू झाले त्यावेळी चीन, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासह सुमारे ३५ देशांतील लोक तेथे काम करीत होते. तेथे जाताच आम्ही शून्यापासून सुरुवात केली. उष्ण हवामानात रात्रंदिवस काम केले. इतर देशांकडून बांधकाम साहित्य मिळविणे हेदेखील मोठे आव्हान होते. सौदी अरब आणि त्याचे मित्र राष्ट्र यूएई, बहरीन आणि इजिप्तने कतारवर नाकेबंदी केली म्हणून आम्हाला बांधकाम साहित्य खरेदीच्या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळा पुरवठ्यात विलंब होतो; पण तरीही काम चालू ठेवले.
केडीके कॉलेजमधून अभियांत्रिकी पदवी घेतलेल्या शाहीदने पुढे सांगितले, कोरोना महामारीच्या काळातही बांधकामाचे काम जोरात सुरू होते. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध होत्या. कधी कधी सुटी न घेता १६ तास काम करावे लागायचे. अंतिम मुदतीच्या एक वर्ष आधी आम्ही प्रकल्प पूर्ण केला. अरब कप फुटबॉल स्पर्धेनिमित्त स्टेडियमची चाचणी घेण्यात आली.
कतारमधील कामगारांना चांगल्या सुविधा
शाहिदच्या मते कतारमधील कामगारांबाबत लोकांमध्ये चुकीची धारणा आहे. इतर आखाती देशांच्या तुलनेत कतार हा शिक्षित देश आहे आणि ते नवीन गोष्टी स्वीकारतात. जागतिक नकाशावर कतारने जबरदस्त बदल घडवून आणले आहेत. तेथे कामगार कल्याणासाठी एक सर्वोच्च समिती होती आणि बांधकामाच्या ठिकाणी आमचा कल्याण विभाग होता, जो मी कुठेही पाहिला नाही.