नागपूरकरांनो काळजी घ्या! मार्चनंतर पुन्हा वाढतोय 'कोरोना'चा ग्राफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 02:15 PM2022-06-06T14:15:39+5:302022-06-06T14:19:09+5:30
२९ मे ते ४ जून या आठवड्यात ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुन्हा एकदा मास्क घालणे, गर्दीचे ठिकाण टाळणे व प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात ओसरल्यानंतर मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दैनंदिन रुग्णांची संख्या १०च्या आत होती. परंतु, मागील दोन आठवड्यांपासून रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. मागील आठवड्यात कोरोना रुग्णांचा ग्राफ ४४ टक्क्यांनी वाढला आहे.
नागपूर जिल्ह्यात १ ते ७ मे या आठवड्यात ७ रुग्ण आढळून आले होते. ८ ते १४ मे या आठवड्यात १७ रुग्णांची भर पडली. मात्र, १५ ते २१ मे या आठवड्यात रुग्णसंख्येत घट झाली. १२ रुग्णांची नोंद झाली. परंतु, २२ ते २८ मे या आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली. २० नवे रुग्ण आढळून आले, तर २९ मे ते ४ जून या आठवड्यात ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुन्हा एकदा मास्क घालणे, गर्दीचे ठिकाण टाळणे व प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले जात आहे.
- मे महिन्यात रुग्णसंख्येत दुपटीने वाढ
कोरोनाची तिसरी लाट जानेवारीत आली. या महिन्यात ६७ हजार ५१४ रुग्ण व १२७ मृत्यूची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्यात ही लाट झपाट्याने कमी झाली. या महिन्यात १५ हजार ९३३ रुग्ण व ८७ मृत्यूची नोंद झाली. मार्च महिन्यात, तर ९८ टक्क्यांनी घट येऊन २४८ रुग्ण व २ मृत्यू होते. एप्रिल महिन्यात ३३ बाधित रुग्ण आढळून आले असताना मे महिन्यात ५१ टक्क्यांनी रुग्णांत वाढ झाली. ६७ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, एप्रिल व मे महिन्यांनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णांचा आकडा १ जूनला नऊवर पोहोचला.
-कोरोनाचे ३२ रुग्ण ॲक्टिव्ह
१९ एप्रिलला कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णाची संख्या केवळ एक होती. आता ती वाढून ३२ वर पोहोचली आहे. यातील शहरातील १८, ग्रामीणमधील १३, तर जिल्हाबाहेरील एक रुग्ण आहे. मागील दोन महिन्यांपासून मृत्यू नाही. यामुळे मृत्यूची संख्या १० हजार ३३८वर स्थिर आहे. आतापर्यंत कोरोनाचे ५ लाख ७७ हजार ८७४ रुग्णांची नोंद झाली आहे. रोज ५००च्या आत कोरोनाचा चाचण्या होत आहेत.
धोक्याची आकडेवारी !
आठवडा : रुग्ण
१ ते ७ मे : ०७
८ ते १४ मे : १७
१५ ते २१ मे : १२
२२ ते २८ मे : २०
२९ मे ते ४ जून : ३६