नागपूरकरांचा 'कॉल' लागेनात, ऑनलाइन पेमेंटही 'फेल'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 04:59 PM2024-12-02T16:59:26+5:302024-12-02T17:00:51+5:30
अनेकांचे कॉल ड्रॉप : बीप ध्वनीसह कॉल व्हायचे बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्याच्या काळ हा मोबाइलचा आहे, असे म्हटले जाते. सर्व गोष्टी मोबाइल फोनशी इतक्या जुळलेल्या आहेत की, मोबाईल फोनशिवाय एकही काम पूर्ण होत नाही. कुणाशी फोनच्या माध्यमातून संपर्क न होणे ही हतबल करणारी स्थिती असते. असाच काहीसा अनुभव रविवारी नागपूरकरांना आला.
नागपूरकरांना फोन करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रारी शहराच्या विविध भागातून येत होत्या. याशिवाय मोबाइल फोनच्या माध्यमातून युपीआय पेमेंट करतानादेखील अनेक अडचणी येत असल्याचे दिसून आले. नागपूरकरांसाठी रविवारची सायंकाळ त्रासदायक ठरली. दुपारी चारनंतर मोठ्या प्रमाणात कॉल ड्रॉपच्या तक्रारी सर्वत्र नागरिकांकडून केल्या जात होत्या. फोन लावल्यावर बीप या ध्वनीसह फोन बंद होत आहेत. शहरात प्रामुख्याने व्होडाफोन-आयडिया, एअरटेल, जिओ या दूरसंचार कंपनीचे ग्राहक आहेत.
सायंकाळी उशिरापर्यंत समस्या
मोबाइल नेटवर्कमध्ये समस्या येत असल्याने नागपूरकरांना एकमेकांना फोन लावण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला ही समस्या व्यक्तिगत असल्याचे समजून अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले. • मात्र, फार वेळपर्यंत अशीच समस्या होत असल्याने नागरिकांनी तक्रार करायला सुरुवात केली. सायंकाळी उशिरापर्यंत ही समस्या कायम होती. फोन काम करीत नसल्यामुळे रविवारी ऑनलाइन यूपीआय पेमेंट करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला.