मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे
By सुमेध वाघमार | Published: March 5, 2024 09:04 PM2024-03-05T21:04:35+5:302024-03-05T21:04:52+5:30
व्यसन हे केवळ अंमली पदार्थांचेच होते असे नाही, तर स्मार्ट फोनचेही व्यसन लागत असल्याचे पुढे आले आहे.
सुमेध वाघमारे, नागपूर: व्यसन हे केवळ अंमली पदार्थांचेच होते असे नाही, तर स्मार्ट फोनचेही व्यसन लागत असल्याचे पुढे आले आहे. विशेषत: मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकारांची झोप उडाली आहे. मेडिकलच्या मानसोपचार विभागात या व्यसनाचे रोज पाच ते सहा रुग्ण येत असल्याची माहिती, या विभागाचे सहयोगी प्राध्यापक व मानसोपचार सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे यांनी दिली.
मानसोपचार सोसायटीचा नव्या कार्यकारणीचा पदग्रहण सोहळा १० मार्च रोजी होणार आहे. याची माहिती देण्यासाठी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी सोसायटीचे नवनियुक्त सचिव डॉ. सुधीर महाजन, डॉ. अभिजीत बनसोड उपस्थित होते.
याची लागत आहे सवय
डॉ. ठाकरे म्हणाले, मेडिकलच्या मानसोपचार विभागात रोज जवळपास १००ते १२० रुग्ण येतात. त्यापैकी पाच ते सहा टक्के रुग्ण झोप येत नसल्याचा तक्रारी घेऊन येतात. या रुग्णांची खोलवर विचारणा केल्यावर त्यांना मोबाईलचे व्यसन लागल्याचे पुढे आले. रात्री उशिरापर्यंत समाजमाध्यमशी जुडून राहणे, रिल्स बघणे, वेब सिरीज बघणे, गेम खेळणे, पॉर्न पाहणे आदी सवयी लागल्याचे आढळून आले.
व्यसनामुळे स्वभावात बदल
मोबाईलच्या व्यसनामुळे अशा व्यक्तीच्या स्वभावात बदल होतो. विशेषत: चिडचिडणे, झोप न येणे, नैराश्यासह इतरही काही बदल जाणवतात. या व्यक्तीच्या एकाग्रतेवरही परिणाम होतो. त्यामुळे या व्यक्तीवर उपचार करताना त्याचे व्यसन कमी करण्यासाठी त्याचा मोबाईलचा वापर हळू- हळू कमी करावा लागतो. त्यासाठी प्रसंगी मनावर ताबा मिळवण्यासाठी काही मानसिक आजारांचे सौम्य औषधांचाही वापर करावा लागत असल्याचे डॉ. ठाकरे यांनी सांगितले.
भावनिक ‘रिल्स’ची येते नशा
डॉ. सुधीर महाजन म्हणाले, फेसबूक, यू ट्यूब, इन्स्टाग्राममधील भाविनक आव्हाने देणारी चांगल्या वाईट ‘रिल्स’ पाहण्याची नशा येते. यामुळे दहा-पंधरा मिनीटांसाठी हातात घेतलेला मोबाईल तासनतास सुटत नाही. पुढे याची सवय लागल्याने त्याचा अभ्यासातील एकाग्रतेवर परिणाम होतो. या सवयी पालकांकडून किंवा घरातील मोठ्या व्यक्तींकडून मुलांना लागलेल्या असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या स्वत:पासून स्क्रिन टाईमवर बंधने घालणे गरजेचे आहे. मुलांचा मोबाईल पाहण्याची सवय एकदम बंद न करता ती हळूहळू करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
अशी आहे नवी कार्यकारणी
मानसोपचार सोसायटी नागपूर शाखेचा कार्यकारणीत अध्यक्ष डॉ. मनिष ठाकरे, सचिव डॉ. सुधीर महाजन, उपाध्यक्ष डॉ. प्रिती भुते, कोषाध्यक्ष डॉ. आशिष कुथे, माजी अध्यक्ष डॉ. निखिल पांडे, माजी सचिवडॉ. अभिषेक मामर्डे, सहसचिव डॉ. श्रेयस मगिया, डॉ. मोसम फिरके यांच्यासह कार्यकारिणी सदस्य डॉ. रवी ढवळे, डॉ. श्रीकांत निंभोरकर, डॉ. प्रांजली वाघमारे, डॉ. मोनिषा दास, डॉ. कुमार कांबळे, व डॉ. श्रीलक्ष्मी व्ही. आदींचा समावेश आहे.