१५ वर्षाच्या मुलाची कमाल! अमेरिकेतील कंपनीकडून मिळाली ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर, पण..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2022 11:22 AM2022-07-25T11:22:32+5:302022-07-25T12:06:59+5:30
घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने वेदांतने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले.
नागपूर : आजकालची पोरं दिवसभर मोबाईलला खिळून असतात. पण याच मोबाईल आणि लॅपटॉपमुळे एका १५ वर्षीय मुलाला अमेरीकेतील कंपनीकडून तब्बल ३३ लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली. हो हे खरं आहे. ‘युट्यूब वरून ‘सॉफ्टवेअर कोडिंग’चे शिक्षण घेत कुणालाही न सांगता या मुलाने एका स्पर्धेत भाग घेतला आणि दोन दिवसांत २,०६६ ओळींचे ‘कोडिंग’ केले. त्याने केलेल्या कोडिंगची दखल अमेरिकेतील एका कंपनीने घेत त्याला नोकरी ऑफर केली. मात्र, वय लहान असल्याने असल्याने त्याला ती नोकरी स्वीकारता आली नाही.
नागपूरचा वेदांत देवकाटे हा शहरातीलच शाळेत इयत्ता दहावीच्या वर्गात शिकतो. त्याने आपल्या शाळेत एक रडार सिस्टम मॉडल डिजाइन तयार केले होते. या स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळालं होतं. दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. मात्र, वेदांतने या वेळेचा सदुपयोग केला. घरातील जुन्या ‘लॅपटॉप’च्या मदतीने त्याने ‘युट्यूब’वर ‘सॉफ्टवेअर’शी संबंधित अनेक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले.
घरच्याघरी युट्यूबवर तो सॉफ्टवेअर कोडिंग शिकला. आईच्या जुन्या लॅपटॉपवर तो त्याचं काम करायचा. असंच एक दिवस इंटरनेट सर्फिंग करताना त्याला वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धेची लिंक सापडली व त्याने त्यात सहभाग घेतला. आणि दोन २,०६६ ओळींचे कोडिंग करून एक हजार ‘सॉफ्टवेअर डेव्हलपर’ला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. त्याची ही कामगिरी पाहता न्यू जर्सीच्या कंपनीने त्याला चक्क ३३ लाख रूपयांची नोकरी ऑफर केली. मात्र, वेदांतचे वय फक्त १५ वर्ष असल्याने कंपनीने सदर प्रस्ताव मागे घेतला. असे असले तरी तरी त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याला नव्याने ‘ऑफर’ देणार असल्याचं आश्वासन कंपनीने वेदांतला दिलं आहे. इतक्या लहान वयात केलेल्या या हटके कामगिरीमुळे वेदांतचे मोठे कौतुक होत आहे.
वेदांतने स्वत:ची एक वेबसाईट तयार केली आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात तब्बल २० हून अधिक ऑनलाइन कोर्सेसचे शिक्षण पूर्ण केले. यामध्ये सी++, जावा, यासह अनेक कठीण कोर्सेसचा समावेश आहे. ज्यावेळी त्याने ही स्पर्धा जिंकली आणि त्याला ३३ लाख रुपयांच्या पॅकेजची ऑफर आली तेव्हा वेदांतच्या कुटुंबीयांना त्याच्यात असलेल्या टॅलेंटची माहिती समजली हे विशेष.