नागपुरातील भरोसा सेलचा पॅटर्न आता राज्यभर; पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 08:34 PM2017-12-20T20:34:58+5:302017-12-20T20:38:41+5:30

अत्याचार पीडित, निराधार महिला-मुलींसाठी नागपुरात सुरू करण्यात आलेला ‘भरोसा सेल’ हा उपक्रम प्रशंसनीय आहे. तो राज्यभर राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

Nagpur's Bharosa cell for woman pattern now state; Pankaja Munde |  नागपुरातील भरोसा सेलचा पॅटर्न आता राज्यभर; पंकजा मुंडे

 नागपुरातील भरोसा सेलचा पॅटर्न आता राज्यभर; पंकजा मुंडे

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी सुरू केला होता सेलप्रशंसनीय उपक्रम असल्याची माहिती

आॅनलाईन लोकमत
नागपूर : अत्याचार पीडित, निराधार महिला-मुलींसाठी नागपुरात सुरू करण्यात आलेला ‘भरोसा सेल’ हा उपक्रम प्रशंसनीय आहे. तो राज्यभर राबविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.
नागपुरात वर्षभरापूर्वी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी भरोसा सेल हा उपक्रम सुरू केला. बलात्कार, घरगुती हिंसाचार किंवा कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिला-मुलींना या उपक्रमाअंतर्गत एकाच ठिकाणी सर्व प्रकारची मदत पुरविली जाते. तिला गरज असेल तर औषधोपचार, तिचे समुपदेशन करून तिच्यावर झालेल्या अत्याचारासंबंधाने कायदेशीर मदतही करण्यात येते. एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या या सेवा उपलब्ध असल्याने नागपुरात भरोसा सेलमध्ये अत्याचारग्रस्त महिला-मुलींच्या तक्रारींची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, घरगुती वादविवाद आणि संशयकल्लोळामुळे निर्माण झालेल्या प्रकरणात संबंधित महिला-पुरुषांचे समुपदेशन करून त्यांचे संसार वाचविण्याचेही काम भरोसामधून झाले आहे. परिणामी नागपूरच्या भरोसा सेलची राज्यभर चर्चा होत आहे. ती कानावर गेल्याने ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज सायंकाळी सुभाषनगरातील भरोसा सेलला भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त श्वेता खेडकर उपस्थित होते. खेडकर यांनी मुंडे यांना भरोसाची कार्यपद्धत थोडक्यात सांगितली. यावेळी ताटातूट होण्याच्या उंबरठ्यावर असताना भरोसातून मिळालेल्या मदतीमुळे पुन्हा संसाराची घडी नीट झालेले अनेक दाम्पत्य हजर होते. त्यांच्याशी संवाद साधून मुंडे यांनी संबंधित दाम्पत्यांच्या भावना जाणून घेतल्या. त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. त्यानंतर भरोसामधील कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. लोकमत प्रतिनिधीने यावेळी मुंडे यांना भरोसाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा करावी, तेवढी थोडेच असल्याचे मत व्यक्त केले. भरोसाचा हा नागपूर पॅटर्न राज्यभरात राबविण्याचा सरकार प्रयत्न करेल, असेही त्या म्हणाल्या. अशा प्रकारचे उपक्रम राज्यात ठिकठिकाणी राबविण्याची गरजही त्यांनी विशद केली.

आमदारांचीही भेट
तत्पूर्वी, या ठिकाणी नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे आणि वर्सोवा ठाणे येथील आमदार भारती लव्हेकर यांनीही भेट दिली. आपल्या मतदारसंघात हा उपक्रम आम्ही राबविणार असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांना पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर आणि पोलीस निरीक्षक शुभदा संख्ये यांनी येथील कामकाजाची माहिती दिली.

 

Web Title: Nagpur's Bharosa cell for woman pattern now state; Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.