नागपूरच्या बायडेन परिवाराचा नाताळ अमेरिकेत; ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 07:00 AM2021-12-25T07:00:00+5:302021-12-25T07:00:06+5:30
Nagpur News नागपूरचे बायडेन कुटुंब अमेरिकेत मुक्कामी असल्याची माहिती आहे. यावरून यावर्षी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे एकत्रित नियाेजन करून वंशपरंपरेचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कुटुंबाचे प्रयत्न असल्याचे बाेलले जात आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : जाे बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून नागपूरचे बायडेन कुटुंब सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरले आहे. पूर्वजांच्या वंशावळीचा तुटलेला धागा १९८१ च्या एका पत्रातून सापडला आणि हे ‘बिछडे हुये’ कुटुंब पुन्हा एकत्र आले. सध्या हे बायडेन कुटुंब अमेरिकेत मुक्कामी असल्याची माहिती आहे. यावरून यावर्षी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे एकत्रित नियाेजन करून वंशपरंपरेचे ऋणानुबंध अधिक घट्ट करण्यासाठी कुटुंबाचे प्रयत्न असल्याचे बाेलले जात आहे.
नाताळचा सण संपूर्ण जगात आनंद व उत्साहात साजरा हाेताे. सर्वांना प्रेमाच्या धाग्यात जाेडणारा हा सण आहे. त्यामुळे जगभरात उत्सवाचे वातावरण आहे. नातेसंबंध मजबूत करणारा हा सण एकत्रित साजरा करण्यावर भर असताे. याच माध्यमातून वेगवेगळ्या देशात वास्तव्यास असलेले बायडेन कुटुंब अधिक जवळ येत आहे. खरे तर बायडेन कुटुंब हे मूळचे उत्तर आयर्लंडचे. तिथूनच ते स्थलांतरित झाले. उपराष्ट्रपती असताना जाे बायडेन यांनीच हा इतिहास उलगडला हाेता. त्यातीलच काही १४७ वर्षांपूर्वी भारतात आले असतील. भारतात तेव्हा या कुटुंबाचे सदस्य ब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीत कामाला हाेते. मात्र ही संपूर्ण वंशावळी तुटलेली व इतिहास विस्मरणात गेला हाेता. मात्र, १९७२ साली जाे बायडेन अमेरिकेत सिनेटर झाल्याची बातमी झळकली आणि नागपुरात राहणाऱ्या लेस्ली बायडेन यांना बायडेन वंशाचे तार सापडले. पुढे १९८१ साली त्यांनी जाे यांना पाठविलेल्या पत्राद्वारे हे वंशाचे तार जुळायलाही लागले. १९८३ ला लेस्ली जग साेडून गेले. पण कुटुंबाचा धागा जाेडण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले हाेते.
२०१३ ला मुंबईत आलेल्या जाे बायडेन यांनी आपले कुटुंब भारतात, मुंबईत आणि नागपुरात राहत असल्याचे नमूद केले, त्यासाठी लेस्लीचे पत्र माेलाचे ठरले. २०१५ मध्ये त्यांनी अमेरिकेतही तसा उल्लेख केला. यावरून त्यांनाही पूर्वजांचे हे संबंध मजबूत करायचे हाेते, हे दिसून येते. त्यामुळे पुढे पुढे त्यांनी भारतातील हे नाते उलगडण्याचा प्रयत्न केला असेलच, हे निश्चित. बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हा काेराेना महामारीचा प्रकाेप व्यापक हाेता. त्यामुळे देशांतर्गत भेटीगाठींना अडथळा हाेता. ओमायक्राॅनचे सावट पसरण्यापूर्वी शिथिलता हाेती. त्यामुळे नाताळचे सेलिब्रेशन यावेळी अमेरिकेतच करायचे, असे नियाेजन असण्याची शक्यता नाकारता येत नाही.