पटेलांकडे नागपूरचा प्रभार
By admin | Published: July 4, 2016 02:40 AM2016-07-04T02:40:31+5:302016-07-04T02:40:31+5:30
देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आता नागपूर शहर व ग्रामीणचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
कार्यकर्ते प्रफुल्लित : राजकीय अनुभवाचा फायदा होणार, गटबाजीवर अंकुश
नागपूर : देशाच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आता नागपूर शहर व ग्रामीणचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पटेल यांना नागपूरच्या राजकारणाचा तगडा अभ्यास आहे. राजकीय खेळीतही पटेल माहीर मानले जातात. आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पटेल यांचा पक्षाला फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांची नागपूरचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. वळसे पाटलांना नागपुरात सातत्याने येणे सोयीचे नव्हते; शिवाय प्रफुल्ल पटेल यांचा नागपूरशी सातत्याने संपर्क आहे. पटेल यांच्यासारख्या वजनदार नेत्यावर नागपूरची जबाबदारी सोपविली तर त्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल, असा विचार मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत मांडण्यात आला व पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. गटबाजीला खतपाणी न घालणारे व कार्यकर्त्यांना न्याय देणारे नेते म्हणून पटेल यांची ओळख आहे. नागपुरात अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यात गटबाजी होती. त्यावर उपाय म्हणून दोन्ही नेत्यांना शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षाची जबाबदारी सोपवावी, हा फॉर्म्युला पटेल यांचाच होता, असे पक्षात बोलले जाते. पटेल यांचे शरद पवार यांच्याशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत.
त्यामुळे पटेलांच्या नियंत्रणाखाली आता पक्षात कुणी गटबाजीला खतपाणी घालण्याचे धाडस करणार नाही, एवढे मात्र नक्की.
नागपूर शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे तेवढी सक्षम नाही. अनिल देशमुख यांनी काटोलमध्ये तर रमेश बंग यांनी हिंगणा मतदारसंघात राष्ट्रवादी जोपासली. पण इतर मतदारसंघात घड्याळाची टीकटीक बंद आहे. नागपूर महापालिकेतही राष्ट्रवादीची तीच स्थिती आहे. दुहेरी आकडाही राष्ट्रवादीला गाठता आलेला नाही. काही माजी नगरसेवक काँग्रेसवासी झाले आहेत, तर विद्यमान नगरसेवकांपैकी काहींनी तर भाजपवासी होण्याची तयारी चालविली आहे. मात्र, आता पटेल यांच्या एन्ट्रीने आऊटगोर्इंग थांबेल. आगामी निवडणुकीत पटेल हे पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी ताकदीने उभे राहतील व याचा फायदा राष्ट्रवादीला होईल, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत.(प्रतिनिधी)
भंडारा-गोंदियाचाही प्रभार
भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांचा प्रभार यापूर्वी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला होता. आता देशमुख यांच्याकडे अकोला आणि गडचिरोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पटेल यांच्याकडे भंडारा व गोंदिया हे त्यांच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे सोपविण्यात आले आहेत.