नागपुरच्या ‘सीपीं’च्या घराजवळ बुलेटने धूमधडाम... पोलिसांनी दिला दणका!

By योगेश पांडे | Published: March 7, 2024 10:27 PM2024-03-07T22:27:48+5:302024-03-07T22:28:01+5:30

आयुक्तांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने काही वेळातच नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडविली.

Nagpur's 'CP's' house with bullets burst into flames... Police gave a bang! | नागपुरच्या ‘सीपीं’च्या घराजवळ बुलेटने धूमधडाम... पोलिसांनी दिला दणका!

नागपुरच्या ‘सीपीं’च्या घराजवळ बुलेटने धूमधडाम... पोलिसांनी दिला दणका!

नागपूर : बुलेट व मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये ‘मॉडिफिकेशन’ करून अक्षरश: फटाके फोडल्यासारखे कर्णकर्कश्श आवाज काढत जाणारे तरुण ही नागपुरकरांची डोकेदुखी बनली आहे. एका अतिउत्साही बुलेटस्वाराने चक्क पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांच्याच निवासस्थानाजवळ बुलेटचे फटाक्यासारखे आवाज काढत धूमधडाम केली. आयुक्तांनी या घटनेची तत्काळ नोंद घेत पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथकाने काही वेळातच नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या तरुणाला ताब्यात घेत चांगलीच अद्दल घडविली.

बुधवारी रात्री हा प्रकार घडला. प्रिन्स नागेश्वर शुक्ला (१९, परसोडी, जामठा, वर्धा रोड) असे आरोपीचे नाव आहे. तो एमएच ४० सीआर १९२१ या २५० सीसीच्या मोटारसायकलने फिरत होता. त्याने सायलेंसरमध्ये कर्णकर्कश्श आवाज व फटाके फोडल्यासारखा आवाज येईल असे बदल केले होते. बुधवारी पोलीस आयुक्त निवासस्थानी असताना प्रिन्सने तेथे मोटारसायकलचे फटाके वाजविले. पोलीस आयुक्तांनी तातडीने पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले.

पोलिसांनी लगेच शोधाशोध करण्यास सुरुवात केली. तो तरुण फुटाळ्याच्या दिशेने गेल्याची बाब कळाली. पोलिसांनी तेथून त्याला ताब्यात घेतले. तो विना हेल्मेट व वेगमर्यादेचे उल्लंघन करून मोटारसायकल चालवत होता. त्याला ११ हजार ७५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तो मुळचा मध्यप्रदेशातील रिवा येथील रहिवासी असून फुटाळा परिसरात का आला याचे समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे त्याला अंबाझरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बुलेटचे फटाके फोडाल तर खबरदार
पोलीस आयुक्तांकडे याअगोदरदेखील अशा बेजबाबदार मोटारसायकलस्वारांच्या तक्रारी आल्या आहेत. वाहनाच्या यंत्रणेच्या कोणत्याही भागाशी छेडछाड करणे हा मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा आहे. म्हणून कुणीही मोटरसायकलच्या सायलेंसरमध्ये बदल करू नये. अषाप्रकारे सायलेंसरच्या रचनेमध्ये बदल करून वाहन चालवितांना मोठा आवाज करणारे चालक दिसले तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले.

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
शहरातील सर्वच भागात असे अतिआगावू मोटारसायकलस्वार आहेत. काही विशिष्ट गॅरेजेसमध्ये हे बदल करून दिले जातात. त्याचीदेखील पोलिसांना माहिती आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून अशा मोटारसायलस्वारांवर हवी तशी कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच अशा नियमतोड्या तरुणांची हिंमत वाढली आहे.
 

Web Title: Nagpur's 'CP's' house with bullets burst into flames... Police gave a bang!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर