स्वप्नातील घर खरेदीसाठी नागपूरकरांची गर्दी
By Admin | Published: October 17, 2015 03:13 AM2015-10-17T03:13:06+5:302015-10-17T03:13:06+5:30
नागपुरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी क्रेडाईच्या वतीने सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली...
‘क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो’: ग्राहकांची ‘साईट व्हिजिट’साठी नोंदणी
नागपूर : नागपुरात घर घेण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी क्रेडाईच्या वतीने सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली असून शहराच्या विविध भागात असलेल्या विविध योजनांची माहिती राणी कोठी येथे आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोच्या माध्यमातून एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. यामुळे आपल्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी नागपूरकर मोठ्या संख्येने या प्रदर्शनाला भेट देत असून अनेक ग्राहकांनी ‘साईट व्हिजिट’साठी नोंदणी केली आहे.
क्रेडाईच्या वतीने राणी कोठी येथे १५ ते १८ आॅक्टोबरदरम्यान क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोचे आयोजन केले आहे. यात स्पॉट फायनान्स, नागपुरातील सर्व प्रॉपर्टी एकाच छताखाली पाहण्याची संधी उपलब्ध झाली असल्यामुळे प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकरांनी एकच गर्दी केल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी दिली. एक्स्पोला एका दिवसात पाच हजार नागरिक येण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. एक्स्पोमध्ये क्रेडाईचे सदस्य असलेल्या बिल्डर्सचे रो हाऊसेस, फ्लॅट, बंगलो उपलब्ध आहेत.
प्रदर्शनाला भेट देऊन दुसऱ्या दिवशी असंख्य नागरिकांनी त्यांना आवड असलेल्या घराची माहिती विविध स्टॉल्सला भेट देऊन घेतली. सध्या सणासुदीचे दिवस असून नागरिक घर खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. यात नोकरदार मंडळी सायंकाळी कार्यालयातून घरी परतल्यानंतर कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देत आहेत. एक्स्पोमध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, अलाहाबाद बँक आदी बँकांचे स्टॉल्स उपलब्ध आहेत. प्रदर्शनात अनेक नागरिकांनी भेट देऊन घर खरेदीसाठी चौकशी केल्याची माहिती पिरॅमिड मेगा सिटी या बेसा येथील प्रकल्पाचे विपणन प्रमुख संजय गोसावी यांनी दिली.
तर अनेक नागरिकांनी साईट व्हिजिटसाठी आपल्या नावाची नोंदणी केल्याची माहिती पिपळा रोडवरील अथर्व नगरीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनोज सुरमवार यांनी दिली. सध्या नागरिक फ्लॅटपेक्षा बंगल्यांच्या स्कीमला पसंती देत असल्याचे हरीहर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक मनीष बधीयानी यांनी सांगितले. (वा. प्र.)