नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर

By नरेश डोंगरे | Published: November 6, 2022 10:07 PM2022-11-06T22:07:14+5:302022-11-06T23:23:37+5:30

तो सध्या ओटीटीवर कमालीचा थयथयाट करीत आहे. बातमी आहे अक्कू यादवच्या अत्याचार आणि हत्याकांडाची !

Nagpur's dangerous don Akku Yadav is back on OTT, on the small screen after 18 years | नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर

नागपूरच्या खतरनाक अक्कूचा ओटीटीवर थयथयाट, १८ वर्षानंतर छोट्या पडद्यावर

googlenewsNext

नरेश डोंगरे

नागपूर : दहशतीचे दुसरे नाव असलेल्या नागपुरातील एका खतरनाक गुंडाचा अखेर अंत झाला. ऐतिहासिक ठरलेल्या घटनेमुळे केवळ नागपूर, महाराष्ट्र नव्हे, तर देश-विदेशात खळबळ उडाली होती. त्याच्या अन्याय अत्याचाराची वाच्यता पुढे अनेक वर्ष चालल्या. आता- आता कुठे त्याच्या कटू आठवणी स्मृती पटलावरून पुसट झाल्या असताना हा खतरनाक गुंड आता १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा अवतरला आहे. तो सध्या ओटीटीवर कमालीचा थयथयाट करीत आहे. बातमी आहे अक्कू यादवच्या अत्याचार आणि हत्याकांडाची !

गायी-म्हशीचे दुध विकत विकत तारुण्यात आलेला आणि नंतर पोलिसांसाठी खबऱ्या म्हणून काम करणारा अक्कू उर्फ भरत कालिचरण यादव हा छोट्या-मोठ्या चोऱ्या-चकाऱ्या करून गुन्हेगार झाला. नंतर तो एवढा खतरनाक बनला की हत्या, हत्येचे प्रयत्न, मारहाण, लुटमार, हल्ले करण्याचे त्याला व्यसनच जडले. त्याला सर्वात मोठी विकृती होती बलात्काराची. प्राैढ असो, मध्यमवयीन असो, तरुण असो वा मुलगी वासनांध अक्कू तिच्यावर अनेकांसमोर अत्याचार करायचा. उत्तर नागपुरातील कस्तुरबा नगरात राहणाऱ्या अनेकींवर त्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांसमोरच बलात्कार केले. विरोध करताच तो अत्यंत निर्दयपणे पिडितेला आणि तिच्या परिवाराला छळायचा. त्याने या वस्तीतील अनेक परिवाराचे जगणे मुश्किल केले होते. त्याची दहशत एवढी प्रचंड होती की नुसता तो दुर उभा दिसला तरी महिलाच नव्हे, पुरुषही लटलट कापायचे. अशा स्थितीतील अत्याचारग्रस्त कस्तुरबानगरवासी एकत्र झाले आणि त्यांनी १३ ऑगस्ट २००४ ला अक्कू यादवचा भर न्यायमंदीराच्या कक्षातच मुडदा पाडला. चक्क न्यायासनासमोरच कुणाची हत्या होण्याची ही देशातील पहिलीच घटना होती. त्यामुळे अक्कू यादव हत्याकांडाने त्यावेळी देश-विदेशात प्रचंड प्रचंड खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासन, न्यायव्यवस्था अन् समाज या विषयावर सर्वत्र प्रदीर्घ मंथन झाले. गुंड आणि पोलिसांच्या अभद्र युतीचीही चिरफाड झाली. पाहता - पाहता या घटनेला आता १८ वर्षे झाली. अक्कूच्या अत्याचारकथा पुसट होऊ लागल्या असतानाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे प्रकरण प्रदर्शीत झाले आहे. हत्याकांडाशी संबंधित अनेक बाबींचा यात समावेश नसला तरी बहुतांश बाबी अत्यंत प्रभावीपणे दाखविल्या गेल्या आहे. या हत्याकांडाशी संबंधित पीडित महिला, पुरूष, अक्कूचे मित्र, पत्रकार, पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून घेतलेली मुलाखत-वजा माहिती दाखविण्यात आली आहे. अक्कू प्रकरणाचे सादरीकरण अत्यंत प्रभावीपणे सादर करण्यात आल्यामुळे ओटीटीवर ते चांगलेच भाव खात आहे.

टॉप टेन ट्रेंडिंग

ओटीटीवर यापूर्वी मुंबईतील २६/११ चा हल्ला, तेलगी प्रकरण, हर्षद मेहता घोटाळा, आश्रमसह अनेक वेबसिरिज कमालीच्या लोकप्रिय ठरल्या. सध्या अक्कू यादवने ओटीटीवर टॉप टेन ट्रेंडिंगमध्ये पहिले स्थान गाठले असून, ही वेबसिरिज चांगलीच धूम मचवत आहे.

यापूर्वी चित्रपटातही झळकला अक्कू

या हत्याकांडानंतर गेल्या १८ वर्षांत अक्कू यादव प्रकरणावर आधारित अनेक कथा झळकल्या. मुंबई, दिल्लीच नव्हे तर साऊथमधील छोट्या-मोठ्या चित्रपट, मालिका निर्माण करणारे अनेक जण नागपुरात येऊन या प्रकरणाची माहिती पोलीस तसेच पत्रकारांकडून घेऊन गेले. अक्कू प्रकरणावर आधारित प्रसिद्ध अभिनेते अमोल पालेकर आणि रिंकू राजगुरूची प्रमुख भूमीका असलेला 'हल्ला हो' हा चित्रपटही नुकताच येऊन गेला. मात्र, नेटफ्लिक्सने या सर्वावर मात केली आहे.

Web Title: Nagpur's dangerous don Akku Yadav is back on OTT, on the small screen after 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.