नागपूरच्या डीसीपीची अंगठी खासगी रुग्णालयात चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:10 AM2018-09-20T00:10:57+5:302018-09-20T00:15:42+5:30
धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची अंगठी चोरीला गेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने धंतोली पोलिसात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लगेच शोध घेतला. सीसीेटीव्हीच्या मदतीने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यास अटक करून अंगठी ताब्यात घेण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली येथील एका खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या झोन पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांची अंगठी चोरीला गेली. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेने धंतोली पोलिसात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी लगेच शोध घेतला. सीसीेटीव्हीच्या मदतीने रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यास अटक करून अंगठी ताब्यात घेण्यात आली.
हर्ष पोद्दार मंगळवारी रात्री ७.३० वाजता धंतोली पोलीस ठाणे हद्दीतील प्रिसिजन हॉस्पिटलमध्ये एमआरआय तपासणीसाठी आले होते. एमआरआय काढण्यापूर्वी अंगावरील दागिने काढावे लागतात. त्यामुळे पोद्दार यांनी सुद्धा आपली अंगठी रुग्णालयाच्या रेडियोलॉजिस्ट मिद प्रभुदास दुकानी यांच्याकडे सोपविली. मिद यांनी ती अंगठी आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवली आणि पोद्दार यांच्या एमआरआय काढण्याच्या कामात व्यस्त झाले. एमआरआय काढल्यानंतर पोद्दार यांनी मिदला अंगठी परत मागितली. तेव्हा मिद यांना ड्रॉवरमध्ये अंगठी दिसली नाही. आयपीएस अधिकाºयाची अंगठी गायब झाल्याने डॉक्टरांमध्येही खळबळ उडाली. त्यांनी मिदसह खोलीत असलेल्या सर्व कर्मचाºयांची विचारपूस केली. सर्वांनीच अंगठीबद्दल माहीत नसल्याचे सांगितले. अंगठी चोरीला गेल्याने डॉक्टरही हादरले. लगेच धंतोली पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. सीसीटीव्हीमध्ये रुग्णालयातील कर्मचारी नम्रता गौतम बन्सोडे अंगठी चोरतांना दिसून आली. पोलिसांनी बुधवारी सकाळी नम्रताला ताब्यात घेऊन विचारपूस केली. तेव्हा तिने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी तिच्या बेलतरोडी येथील घरातून अंगठी जप्त केली. नम्रता एक वर्षापासून रुग्णालयात काम करीत होती.