कॅलिफोर्नियातील बोट दुर्घटनेत नागपूरकर ‘डेंटिस्ट’चा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 09:23 PM2019-09-04T21:23:58+5:302019-09-04T21:25:27+5:30
अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला. शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.सतीश देवपुजारी हे संजिरी यांचे वडील आहेत. ही माहिती कळताच शहरातील वैद्यकीय जगताला धक्का बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. देवपुजारी हे तातडीने अमेरिकेला रवाना झाले आहेत.
डॉ. संजिरी व कौस्तुभ हे दोघेही ‘स्कुबा डायव्हिंग’साठी या बोटवर गेले होते. त्यांची एकूण ‘ट्रीप’ ही तीन दिवसाची होती. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सॅन्टा बारबरा किनाऱ्याजवळील सांताक्रूझ या बेटानजिक ही बोट रात्री थांबविण्यात आली होती. या बोटमध्ये एकूण ३८ प्रवासी व कर्मचारी होते. २ सप्टेंबर रोजी पहाटे अचानक बोटीला आग लागली. सर्व प्रवासी साखरझोपेतच असताना ही आग लागल्याने कुणालाही सांभाळण्याची संधीच मिळाली नाही. बोटवरील पाचही कर्मचारी वाचले परंतु प्रवासी वाचू शकले नाहीत. अमेरिकेच्या कोस्टगार्डला २० प्रवाशांचे शव सापडले. आगीमुळे ओळख पटविणेदेखील कठीण झाले असल्यामुळे प्रवाशांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात येणार आहे.
दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्न
डॉ.संजिरी यांचे शिक्षण शरद पवार कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री येथून झाले होते. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला गेल्या होत्या. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांचे कौस्तुभ निर्मल यांच्याशी लग्न झाले होते. कौस्तुभ हे मूळचे जयपूर येथील होते व स्टॅमफोर्ड येथे स्थायिक झाले होते. ते वित्त क्षेत्रात कार्यरत होते. ‘विकएन्ड’साठी दोघेही या बोटवर गेले. तीनदिवसीय सहलीतील अखेरच्या टप्प्यात हा जीवघेणा अपघात झाला व त्यात दोघांनाही जीव गमवावा लागला.
कुटुंबीय अमेरिकेला रवाना
यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ.सतीश देवपुजारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु त्यांच्या काही परिचितांनी दिलेल्या माहितीनुसार ते अमेरिकेला रवाना झाले आहेत. शिवाय त्यांची मोठी मुलगी डॉ.श्रुती यादेखील अमेरिकेलाच असते व त्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.