नागपूरचे  कामगार रुग्णालय सहा तास अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 09:34 PM2018-07-09T21:34:06+5:302018-07-09T21:35:08+5:30

पावसाळी विधिमंडळाच्या निमित्ताने कामगार मंत्री, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त व संचालक नागपुरात असताना कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या नागपूर कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांना सलग सहा तास अंधारात काढावे लागले. कामगारांच्या आरोग्याकडे काय लक्ष द्यावे, याच भावनेतून कामकाज सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Nagpur's Employee Hospital is in the dark six hours | नागपूरचे  कामगार रुग्णालय सहा तास अंधारात

नागपूरचे  कामगार रुग्णालय सहा तास अंधारात

Next
ठळक मुद्देकेबल जळाले : एक्स-रे, शस्त्रक्रियागृह ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळी विधिमंडळाच्या निमित्ताने कामगार मंत्री, राज्य कामगार विमा योजनेचे आयुक्त व संचालक नागपुरात असताना कामगारांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या नागपूर कामगार विमा रुग्णालयातील रुग्णांना सलग सहा तास अंधारात काढावे लागले. कामगारांच्या आरोग्याकडे काय लक्ष द्यावे, याच भावनेतून कामकाज सुरू असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या सोमवारीपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला (ईएसआयसी) अखेरची घरघर लागली आहे. विविध संवर्गातील सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून औषधांचा तुटवडा पडला आहे. केवळ आकस्मिक औषधे खरेदी करून कसेतरी रुग्णालय चालविले जात आहे. नवी पद भरती होत नसल्याने कार्यरत डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडला आहे. परिणामी, वरिष्ठ डॉक्टरांच्या सेवानिवृत्ती व स्वेच्छानिवृत्तीमुळे एकेक वॉर्ड बंद होत आहेत. अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याने रुग्णांना दुसºया रुग्णालयात पाठविले जात आहे. यातही संबंधित रुग्णालयाची देयके प्रलंबित ठेवली जात असल्याने खासगी रुग्णालये आपली सेवा देणे बंद करीत आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे. उपचारासाठी वेतनामधून पैसा कपात होऊनही उपचार मिळत नसल्याचा आरोप होत आहे. यातच सलग सहा तास वीज खंडित राहिल्याने रुग्णांना अंधारात रात्र काढावी लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविवारी रात्री २ वाजताच्या सुमारास रुग्णालयाचे अचानक केबल जळाले. यामुळे सर्वत्र अंधार पसरला. निवासी डॉक्टरांनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनी याची माहिती बांधकाम विभागाच्या संबंधित विभागाला दिली. परंतु त्यांच्याकडून कुठलीच उपाययोजना झाली नाही. रुग्णालयात चार वॉर्ड मिळून ६० वर रुग्ण होते. यात महिला व लहान मुलांचाही समावेश होता. या सर्वांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. रात्री जनरेटर सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे कनेक्शन नीट नसल्याने त्याचा फारसा फायदा झाला नसल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे होते. सकाळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्पुरती सोय करून दिली. दुपारी ३ वाजतानंतर नवीन केबल टाकून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.

Web Title: Nagpur's Employee Hospital is in the dark six hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.