नागपुरातील प्रसिद्ध 'परम का ढाबा'च्या संचालकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2022 10:37 AM2022-03-09T10:37:32+5:302022-03-09T10:38:12+5:30
नागपुरातील फेमस 'परम का ढाबा'चा संचालक सोनी भूपेंद्र राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
नागपूर : शहरातील फूड लव्हर्सचा आकर्षणाचा विषय असलेला ‘परम का ढाबा’चा संचालक सोनी भूपेंद्र राजपूत (वय ३६) याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. पाचपावलीत राहणारा सोनी याचा उत्तर नागपुरात ढाबा होता.
नागपुरातील फूड लव्हर्समध्ये 'परम की दाल' (Param ki Dal) प्रसिद्ध असून या नावाने त्याने खवय्यांमध्ये एक वेगळी ओळख बनविली होती. त्याच्या ढाब्यावर कॉलेजियन्सच्या उड्या पडायच्या. सोनीची खास स्टाईलही ग्राहकांना आकर्षित करायची. यूट्यूबवरही त्याचे अनेक फॅन फॉलोअर्स आहेत.
सोनी गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. निकटच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याची पत्नी आणि मुलगा जालंधर (पंजाब) शहरात गेले होते. त्यामुळेही तो अस्वस्थ असायचा. मंगळवारी सोनीचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. मनदीपसिंग उपेंद्रसिंग राजपूत (वय ३४) यांनी दिलेल्या माहितीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.