नागपूर राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा
By admin | Published: October 3, 2016 02:56 AM2016-10-03T02:56:38+5:302016-10-03T02:56:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर डिजिटल जिल्ह्याची घोषणा मुंबई येथून केली.
मुख्यमंत्र्यांनी साधला शेतकरी, बचतगट, विद्यार्थ्यांशी संवाद : मुंबई ते डोंगरगाव ठरले थेट संवाद होण्याचे माध्यम
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर डिजिटल जिल्ह्याची घोषणा मुंबई येथून केली. त्यानंतर डोंगरगाव, आदिवासी आश्रमशाळा बेलदा तसेच ब्राह्मणी येथील ग्रामस्थांना मायक्रो एटीएमच्या माध्यमातून श्रावणबाळ योजनेचा लाभ घरपोच देण्याचा उपक्रमासोबतच शेतकरी, महिला बचत गट व विद्यार्थ्यांशी डिजिटल व्हिलेज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकरी व ग्रामस्थांना लाभ देण्यासाठी प्रभावी वापर करणार असल्याचे यावेळी सांगितले.
डोंगरगाव येथे ग्रामपंचायत भवनामध्ये डिजिटल व्हिलेज अंतर्गत मुंबई येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा संवाद हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, आमदार समीर मेघे, जिल्हा परिषदेचे सदस्य रुपराव शिंदे, पंचायत समिती सभापती दिलीप नंदागवळी, रेखाताई मसराम, उपमुख्य कार्यपालन अधिकारी अरुण निंबाळकर, उपविभागीय अधिकारी बाळासाहेब कोळेकर, डोंगरगावचे सरपंच देवेंद्र गौर उपस्थित होते.
जिल्हा परिषद थेट संपर्क यंत्रणाने जोडणार
ग्रामीण जनतेला जलद सेवा उपलब्ध व्हाव्यात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, पंचायत समिती तसेच तालुका कृषी अधिकारी यांचेसोबत मुख्य कार्यपालन अधिकारी थेट संपर्क करतांना तसेच सर्व पंचायत समित्या आॅनलाईन करण्यात येऊन माहिती तंत्रज्ञानाचा इंटरनेट व वायफायचा प्रभावी वापर करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. कृषी सहायक व ग्राम सहायकांना स्मार्टफोन देऊन त्यांना शेतकरी व बचत गटांशी थेट संवाद साधता येईल त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
मायक्रो एटीएमद्वारे मिळाला घरपोच लाभ
डिजिटल कनेक्टिविटीमुळे अतिदुग्रम अशा ब्राह्मणी (उमरेड) येथील वृद्ध महिलेला बँक आॅफ बडोदाच्या माध्यमातून मायक्रो एटीएमद्वारा श्रावणबाळ योजनेचे ६०० रुपयाचे अनुदान देण्यात आले. ब्राह्मणी या गावात बँकेची सुविधा नसल्यामुळे व डिजिटल कनेक्टिव्हीटी उपलब्ध झाल्यामुळे घरपोच बँकेची सेवा उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेचा आर्थिक लाभ वायफाय सुविधेमुळे घरपोच देणे शक्य झाले असून वृद्ध महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. यावेळी सुधीर पारवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मकरंदे उपस्थित होते.