नागपूर फॉर्म्युल्याने वेधले राज्याचे लक्ष
By admin | Published: October 26, 2014 12:17 AM2014-10-26T00:17:51+5:302014-10-26T00:17:51+5:30
राज्यात कोण मोठा ‘भाऊ’ यावरून युतीत तेढ निर्माण झाली असताना नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षानी युती करून सत्ता स्थापन केली. युती तुटल्यावर राज्यात दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध लढत
जि.प.मधील युती कायम : सावनेरात भाजपने दिला होता सेनेला पाठिंबा
गणेश हूड - नागपूर
राज्यात कोण मोठा ‘भाऊ’ यावरून युतीत तेढ निर्माण झाली असताना नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्षानी युती करून सत्ता स्थापन केली. युती तुटल्यावर राज्यात दोन्ही पक्ष परस्परांविरुद्ध लढत असताना सावनेरमध्ये मात्र भाजपने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. ही दोन्ही उदाहरणे आता सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकत्र येऊ घातलेल्या भाजप-सेनेसाठी आदर्श पर्याय म्हणून लक्ष केंद्रित करणारी आहेत.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने राज्यात जागा वाढवून मागितल्या. राज्यात आपणच मोठा भाऊ असे म्हणत सेनेने हा प्रस्ताव फेटाळला. यातून दोन्ही पक्षात तेढ निर्माण झाली. युती तुटणार अशी चर्चा राज्यभरात सुरू असताना नागपूर जि.प.तील अध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडणुका होत्या. दोन्ही पक्षातील ताणतणाव लक्षात घेता जि.प.तील भाजप-सेना युती तुटेल व युतीच्या हातून सत्ता जाईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सामंज्यस्याची भूमिका घेत युती कायम ठेवून सत्ता अबाधित राखली. काही दिवसातच राज्य पातळीवरील युती तुटली. दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकले. नागपूर जिल्ह्यातही भाजप उमेदवारांच्या विरोधात सेनेचे उमेदवार रिंगणात होते. तांत्रिक कारणामुळे सावनेरमध्ये भाजप उमेदवार सोनबा मुसळे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला. या कठीण प्रसंगी भाजपने वेगळा विचार न करता सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. निवडणुका झाल्यानंतर दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वीच नागपूर जिल्ह्यात दोन्ही पक्षातील आपसी सामंज्यस्याचे दर्शन घडविणाऱ्या वरील दोन घटना महत्त्वपूर्ण ठरतात. बदलत्या राजकीय परिस्थितीत हाच नागपूर फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षासाठी आदर्श ठरू शकणार असल्याची राजकीय पातळीवर चर्चा आहे. (प्रतिनिधी)