नागपूरचा कचरा जबलपूरला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:40 PM2019-05-16T23:40:24+5:302019-05-16T23:42:14+5:30

भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. परंतु भांडेवाडी येथील कचरा जबलपूर येथे नेला जाणार असल्याने नागरिकांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.

Nagpur's garbage will go to Jabalpur | नागपूरचा कचरा जबलपूरला जाणार

नागपूरचा कचरा जबलपूरला जाणार

googlenewsNext
ठळक मुद्देभांडेवाडी परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड परिसरातील नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त आहेत. डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेण्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याचा मोठा डोंगर उभा राहिला असून कचरा कुठे साठवावा, असा प्रश्न महापालिका प्रशासनाला पडला आहे. परंतु भांडेवाडी येथील कचरा जबलपूर येथे नेला जाणार असल्याने नागरिकांना आता लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती प्रकल्पांना या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यातून महापालिकेला वर्षाला ८० कोटी मिळत आहे. तसेच वीज प्रकल्पासाठी सांडपाणी वापरले जात असल्याने पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत आहे. गडकरी यांच्याच प्रयत्नातून कचऱ्यापासून वीजनिर्मिती व बायो-फ्युएल निर्माण केले जाणार आहे. यातून महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यासोबतच कचऱ्याचीही समस्या मार्गी लागणार आहे.
नागपूर शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा भांडेवाडी येथील डम्पिंग यार्ड येथे साठविला जातो. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्याने डम्पिंग यार्डची क्षमता संपली आहे. याचा विचार करता महापालिकेने एस्लेल इन्फ्रा गु्रपशी भांडेवाडी येथे कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा करार के ला आहे. यासाठी १० एकर जागा दिली आहे. नागपुरातील प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही. दोन वर्षात हा प्रकल्प उभारावयाचा आहे. मात्र या कंपनीने मध्य प्रदेशातील जबलपूर येथे कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी भांडेवाडी येथील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून निर्माण होणारे आरडीएफ जबलपूरला नेणार आहे. नागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासोबतच भांडेवाडी येथील कचऱ्याची विल्हेवाट लागणार असल्याने मोठी समस्या सुटणार आहे.
भांडेवाडी येथे बायो-मायनिंग
महापालिकेने भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे साचून असलेल्या कचऱ्याचे बायो-मायनिंग सुरू केले आहे. कचऱ्याचे वर्गींकरण तसेच रासायनिक प्रक्रिया करून कचरा नष्ट केला जात आहे. यामुळे डम्पिंग यार्डमध्ये साचून असलेल्या कचऱ्याची मोठ्या प्रमाणात विल्हेवाट लावण्यात यश आले आहे. दुर्गंधीचा त्रास कमी झाला आहे.
भांडेवाडीत ११ लाख मेट्रिक टन कचरा
भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे ११ लाख मेट्रिक टन कचरा साचून आहे. डम्पिंगयार्डची क्षमता संपली आहे. त्यातच शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. यामुळे कचरा साठविण्याची समस्या निर्माण झाली आहे. येथील कचरा जबलपूरला जाणार असल्याने भांडेवाडी येथील जागा रिकामी होईल. या जागेवर एस्लेल गु्रप कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभारणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गडकरींच्या प्रयत्नामुळे मनपाला आर्थिक फायदा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी महापालिकेला सांडपाण्यापासून ८० कोटींचे उत्पन्न होत आहे. तसेच एस्सेल ग्रुप दररोज ८०० टन कचरा वीजनिर्मितीसाठी महापालिकेकडून घेणार आहे. या कचऱ्यातून ११.५ मेगावॅट वीजनिर्मिती होईल. ही वीज पारडी येथील उपकेंद्राला देण्यात येणार आहे. येथून ही वीज महावितरणकडे वळती केली जाणार आहे. तसेच कंपोस्ट खत, बायोफ्युअल निर्माण होणार असल्याने भविष्यात यामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
आठ-दहा दिवसात आरडीएफ जबलपूरला जाणार
एस्लेल गु्पचा जबलपूर येथे कचऱ्यापासून वीज प्रकल्प सुरू झाला आहे. भांडेवाडी येथील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून निर्माण होणारे आरडीएफ जबलपूर येथील वीज प्रकल्पासाठी नेले जाणार आहे. येत्या आठ-दहा दिवसात याला सुरुवात होईल. यामुळे भांडेवाडी डम्पिंगयार्ड मधील चार एकर जागा खाली होणार आहे. भांडेवाडीत कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर महापालिका कचऱ्यातून बायो ऑईल, बायोचरची निर्मिती करणार आहे. येथे दररोज ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती केली जाणार आहे.
अभिजित बांगर, आयुक्त महापालिका

Web Title: Nagpur's garbage will go to Jabalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.