नागपूरची ही चिमुकली आहे सगळ्यात भारी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:19 AM2019-10-23T00:19:02+5:302019-10-23T00:26:05+5:30
गिरिशा आर्या हिने आग्रा येथे पार पडलेल्या ‘मिस किडस् युनिव्हर्स’चा शीर्षक किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणारी गिरिशा ही या वयातील पहिलीच नागपूरकर ठरली असून, तिच्या या यशाने देशात नागपूरचे नाव गौरविल्या गेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विविध गुणवैशिष्ट्यांसाठी अनेक पुरस्कार प्राप्त करणाऱ्या गिरिशा आर्या हिने आग्रा येथे पार पडलेल्या ‘मिस किडस् युनिव्हर्स’चा शीर्षक किताब पटकावला आहे. हा किताब पटकावणारी गिरिशा ही या वयातील पहिलीच नागपूरकर ठरली असून, तिच्या या यशाने देशात नागपूरचे नाव गौरविल्या गेले आहे.
कोराडी रोडवरील लिव्हरेज ग्रीन परिसरातील ट्युलिप बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या संजय व रिना आर्या यांची गिरिशा ही मुलगी असून, तिने या कोवळ्या वयातच आगामी ध्येयधोरणावर चालण्याची किमया साधली आहे. खुशी इव्हेंटस्च्या वतीने २० ऑक्टोबर रोजी आग्रा येथील ओरिएण्ट ताजमध्ये पार पडलेल्या या मुलांच्या स्पर्धेतील अंतिम फेरीत तिने आशिया खंडातील तब्बल ६० स्पर्धकांवर आघाडी घेत ‘मिस किडस् युनिव्हर्स’ चा किताब आपल्या नावे केला. यात पाकिस्तान, भूतान, बांगलादेश आदी देशांतूनही स्पर्धक सहभागी झाले होते. प्रसिद्ध पंजाबी गायक जस्सी गिल व बब्बल राय, अभिनेता प्रियांक शर्मा व अभिनेत्री अनमोल चौधरी यांच्या हस्ते गिरिशाने हा पुरस्कार स्वीकारला. वय वर्ष एक ते पाच, ६ ते १२, १३ ते १८, १९ ते ३० व ३० वर्षाच्या पार अशा पाच गटात पार पडलेल्या या स्पर्धेत गिरिशाने ६ ते १२ वयोगटात हा पुरस्कार प्राप्त केला. गिरिशाचे मंगळवारी नागपुरात आगमन होताच रेल्वेस्थानकावर लॉयन्स क्लबच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच तिच्या शेजारच्यांनी गिरिशाच्या विजयाचा जल्लोष करीत आनंद साजरा केला. विशेष म्हणजे, याच स्पर्धेत गिरिशाचा लहान भाऊ पाच वर्षीय तनय यानेही ‘मोस्ट स्टायलिश किड ऑफ दि युनिव्हर्स’ हा किताब पटकावला आहे.
एवढ्या कमी वयात गिरिशाची एवढी मोठी भरारी वाखाणण्याजोगी आहे. ती पोदार इंटरनॅशनल स्कूलची पाचव्या वर्गाची विद्यार्थिनी असून, तिने आतापर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेत १९ किताब स्वत:च्या नावावर केले आहेत. त्यात ‘पप्पा की परी’, तीनवेळा ‘बेस्ट किड मॉडेल इन इंडिया’, ‘बच्चो की दुनिया फॅशन शो’चा किताब, ‘एकलनृत्याचा किताब’,‘ऑल इडिया मॉडेलिंग कॉन्टेस्ट’चा किताब आदींचा समावेश आहे.
मला ‘मिस युनिव्हर्स’ बनायचे आहे - गिरिशा आर्या
मी नृत्य, अभिनय आदींमध्ये तयारी करीत आहे. माझे आई-वडील मला यात मार्गदर्शन करीत असतात. माझ्या परिश्रमाने आणि
आई-वडिलांच्या मार्गदर्शनात मला पुढे जायचे आहे. ‘मिस युनिव्हर्स’ बनण्याचे माझे स्वप्न असून, त्याच स्पर्धेसाठीची ही पहिली पायरी म्हणून बघत असल्याचे गिरिशा आर्या हिने सांगितले.
मुलांचे स्वप्न पूर्ण करणे आमचे कर्तव्यच - संजय आर्या
मुलांनी स्वप्न बघावे आणि ते पूर्ण करण्याचे प्राथमिक प्रयत्न पालकांचेच असते. पुढे त्यांचे परिश्रम आणि जिद्दच त्यांचा मार्ग प्रशस्त करते. गिरिशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तिला नियमित मार्गदर्शन करीत असल्याचे गिरिशाचे वडील संजय आर्या यांनी सांगितले.