नागपूरच्या गोरेवाडा तलावाकाठी ओल्या पार्ट्या; जंगलाला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 10:33 AM2018-04-20T10:33:40+5:302018-04-20T10:33:40+5:30
गोरेवाडा जंगलासाठी महापालिका वॉटर फिल्टरकडील तलावाचा २५ हेक्टरचा खुला परिसर डोकेदुखी झाला आहे. अनेकदा युवकांच्या टोळ्या चूल पेटवून पार्ट्या करतात. या चुलीतून उडणाऱ्या ठिणग्याही आग लागण्याचे कारण ठरु शकतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा जंगलासाठी महापालिका वॉटर फिल्टरकडील तलावाचा २५ हेक्टरचा खुला परिसर डोकेदुखी झाला आहे. सूत्रानुसार गोरेवाडा गावाकडून तलावात पोहण्यासाठी युवकांची नेहमीच गर्दी राहते तर असामाजिक तत्त्व जुगार खेळण्यासाठी आणि दारू पिण्यासाठी हा परिसर सुरक्षित समजतात. अनेकदा युवकांच्या टोळ्या वॉटर फिल्टरच्या जवळपास चूल पेटवून पार्ट्या करतात. या चुलीतून उडणाऱ्या ठिणग्याही आग लागण्याचे कारण ठरु शकतात. मानकापूर बायपास काटोल रोडच्या दिशेनेही जंगलात आग लागण्याच्या घटना चिंता वाढवत आहेत. दोन महिन्यापूर्वी गोरेवाडात आगीच्या ९ ते १० घटना घडल्या आहेत.
बुधवारी रात्री तलावाच्या महापालिकेच्या भागातील आग वाढल्यामुळे गोरेवाडाच्या राखीव वनक्षेत्रात आग लागली असती. परंतु गस्त घालत असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वेळीच ही बाब लक्षात आल्यामुळे त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
गुरुवारी सायंकाळी मानकापूर रिंग रोडकडून कुणीतरी गोरेवाडाच्या भिंतीला लागून कचऱ्यात आग पेटविली. त्याची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांना ब्लोअर, पाण्याचे टँकर घेऊन आग विझविण्यासाठी धावपळ करावी लागली. आंतरराष्ट्रीय गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या बांधकामापूर्वीच काटोल रोडच्या दोन्ही बाजुने वनक्षेत्राला भिंत तयार करुन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आधी गोरेवाडा तलाव, रेस्क्यु सेंटर आणि जंगल सफारी क्षेत्राच्या चारी बाजूने १६ किलोमीटरसह दाभाला लागून नवनिर्मित भारतीय व इतर सफारीच्या क्षेत्राचीही मजबूत सुरक्षा भिंत तयार करुन घेराबंदी करण्यात आली आहे. त्यानंतरही गोरेवाडा जंगलात वारंवार आगीच्या घटनात वाढ झाली आहे.
मानकापूर रिंग रोडवर कचरा घर
मानकापूर रिंग रोडकडून गोरेवाडाच्या सुरक्षा भिंतीला लागून नागरिकांनी मोठे कचरा घर तयार केले आहे. येथे पोते, रेक्झिन आणि कचरा टाकून जाळण्यात येतो. या कचऱ्याला नेहमीच आग लावण्यात येते. गुरुवारीही या कचऱ्याला भीषण आग लागली.कचऱ्याला लागलेल्या आगीच्या ठिणग्या सुरक्षा भिंतीच्या आत पोहोचण्याची शक्यता पाहून वन कर्मचारी आग विझविण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
आतून सर्व्हिस रोड तयार करून गस्त
गोरेवाडाचे आरएफओ सुनील सोनटक्के यांनी सांगितले की, वन क्षेत्राच्या आतून गोरेवाडाच्या सुरक्षा भिंतीला लागून चारही सर्व्हिस रोड तयार करून नियमित गस्त सुरू करण्यात आली आहे. गोरेवाडाला लागून असलेल्या गाव, वस्त्यात बैठक घेऊन जंगलाचे महत्त्व सांगून घटनांची माहिती मिळविण्यासाठी समन्वय प्रस्थापित करण्यात येत आहे. त्यानुसार आजूबाजूच्या गावातील नागरिकांसाठी जंगल सफारीचे आयोजनही करण्यात आले होते.
संबंधित क्षेत्र महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात
गोरेवाडाचे डीएफओ नंदकिशोर काळे यांनी सांगितले की, वनक्षेत्रात आगीच्या घटना थांबविण्यासाठी तातडीने प्रयत्न करण्यात येतात. तलावाच्या भागाकडून चिंता वाढली आहे. परंतु हा परिसर महापालिकेच्या अधिकार क्षेत्रात येत असल्यामुळे गोरेवाडा व्यवस्थापन त्यात हस्तक्षेप करीत नाही. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा होत आहे.