नागपुरात अट्टल चोरटा गवसला : सोन्यासह सव्वासहा लाखांचे दागिने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 03:48 PM2018-03-12T15:48:57+5:302018-03-12T15:49:09+5:30
दर दोन दिवसाआड भरदिवसा घरफोडी करून रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या आणि पोलिसांच्या नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर बेलतरोडी पोलिसांनी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दर दोन दिवसाआड भरदिवसा घरफोडी करून रोख आणि सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या आणि पोलिसांच्या नाकीनऊ आणणाऱ्या अट्टल चोरट्याला अखेर बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. खुशाल पंढरी बारापात्रे (वय ३०) असे त्याचे नाव असून, तो बुटीबोरीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये राहतो. त्याने गेल्या अडीच महिन्यात बेलतरोडी, हुडकेश्वर आणि नंदनवन भागात १० घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्याने चोरलेला ६ लाख २० हजारांचा ऐवज पोलिसांनी एका सराफा व्यावसायिकाकडून जप्त केला. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी या अट्टल चोरट्याच्या गुन्ह्याची पत्रकारांना रविवारी दुपारी माहिती दिली.
रिंगरोडलगतच्या बेसा-बेलतरोडी, हुडकेश्वर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागात फेब्रुवारी महिन्यापासून चोरी- घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली होती. दर दोन दिवसाआड या भागात भरदुपारी घरफोडीची घटना घडत असल्याने नागरिक दहशतीत आले होते तर पोलिसही दहशतीत आले होते. सर्व घरफोडीची गुन्हे एकसारख्या पद्धतीने घडत असल्याने परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी आरोपीला जेरबंद करण्यासाठी या भागात १०० ते १५० होमगार्ड नियुक्त केले. अनेकांना साध्या वेशात वेगवेगळ्या भागातील कुलूपबंद घरांवर नजर ठेवण्याची तसेच संशयितांना ताब्यात घेण्याची जबाबदारी सोपविली.
होमगार्डच्या मदतीला पोलिसही होते. तीन दिवसांपूर्वी एका घराचे कुलूप तोडून आतमध्ये शिरण्याच्या तयारीत असलेला खुशाल बारापात्रे बेलतरोडी पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी बोलते केले असता, त्याने या भागात गेल्या एक ते दीड महिन्यात १० ते १२ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
गर्लफ्रेन्डवर उधळण
आरोपी खुशाल हा अट्टल गुन्हेगार आहे. तो फेब्रुवारी महिन्यातच कारागृहातून जामिनावर बाहेर आला. त्याला जुगाराचे भारी व्यसन असून, जुगाराचा शौक पूर्ण करण्यासोबतच गर्लफ्रेन्डवर पैसे उधळण्यासाठी त्याने बिनबोभाटपणे घरफोडीचा सपाटा लावला होता. सकाळी १० वाजता तो बुटीबोरीहून त्याची मोटरसायकल घेऊन निघायचा.बेलतरोडी, हुडकेश्वर आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिंगरोडजवळची वस्ती विरळ आहे. या भागात ज्या घराला कुलूप लावून दिसले, त्या घरात तो घरफोडी करायचा. दागिने आणि रक्कम मिळाल्यानंतर बुटीबोरीला निघून जायचा. विशेष म्हणजे, तो अट्टल गुन्हेगार असल्यामुळे बुटीबोरी पोलीस त्याला चेक करण्यासाठी नेहमीच रात्री त्याच्या घरी जात होते. पोलिसांना तो घरीच झोपून दिसत असल्याने त्याच्यावर संशय घेतला जात नव्हता. आरोपी खुशाल याची बुटीबोरीतील चेतनकुमार अश्विनी सोनी (वय ४३) नामक सराफा व्यापाºयासोबत मैत्री आहे. सोनी इंडोरामा कंपनीत काम करतो. त्याचे साईपार्क, बुटीबोरी येथे सराफा दुकानही आहे. चोरलेले दागिने खुशाल सोनीकडे गहाण ठेवायचा. त्याच्याकडून मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम आपल्या गर्लफ्रेन्डवर उधळायचा तर, बाकी रक्कम जुगाराचा शौक पूर्ण करण्यासाठी वापरायचा. जुगारात रक्कम हरला की पुन्हा तो घरफोडी करण्यासाठी निघायचा. दर दोन दिवसाआड येत असलेल्या तक्रारीमुळे पोलिसही हैराण झाले होते. अखेर त्याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याला अटक केल्यानंतर सराफा व्यावसायिक सोनीकडून पोलिसांनी २२० ग्रॅम सोन्याचे आणि ५०० ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. या गुन्ह्यात सराफा सोनीलाही पोलिसांनी आरोपी बनविले आहे. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक संदीप आगरकर, हवालदार अविनाश ठाकरे, नायक रणधीर दीक्षित, नायक गोपाल देशमुख, प्रशांत सोनुलकर, शिपाई राजेंद्र नागपुरे आणि भाग्यश्री यांनी बजावल्याचेही उपायुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी बेलतरोडीचे ठाणेदार विजय तलवारे आणि हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने उपस्थित होते.
जळगाव-औरंगाबादची जोडगोळी
अशाच प्रकारे जळगाव जिल्ह्यातील फैजापूर (ता. यावल) येथील कुमार ऊर्फ पप्पू सुरेश परदेशी (वय ३१) तसेच चेतन प्रकाश बोरकर (वय २४, रा. रायगाव वैजापूर, जि. औरंगाबाद) या दोन अट्टल चोरट्यांनाही अटक केली. भुसावळ (जि. जळगाव) च्या कारागृहात असताना या दोघांची मैत्री झाली. त्यांचे नातेवाईक नागपुरात राहतात. त्यामुळे हे दोघे नागपुरात यायचे. कॉटन मार्केटमध्ये एका लॉजमध्ये राहायचे. दिवसभर कॅबने (टॅक्सी) विविध भागात फिरून कोणत्या घराला कुलूप आहे, ते शोधायचे आणि रात्री तेथे घरफोडी करायचे. चोरलेला माल लॉजमध्ये जमा केल्यानंतर तो दिल्ली, मथुरा येथे परदेशीच्या सासरवाडीत नेऊन विकायचे. त्यांच्याकडून २० ग्राम सोन्यासह ५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने, द्वितीय निरीक्षक अरविंद भोळे, सहायक निरीक्षक महल्ले, उपनिरीक्षक सचिन धर्मेजवार, हवालदार संदीप राजेंद्र, युवराज, नायक परेश प्रवीण, शैलेश, चंद्रशेखर, अश्विन, नरेंद्र, चंदन, नीलेश, शिपायी विलास, संतोष देवचंद यांनी बजावली. सध्या आरोपीची ही जोडगोळी कळमना पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना दागिने जप्त करण्यासाठी पोलिसांनी मथुरा येथे नेले आहे.