निसर्गसौंदर्याने नटलेले नागपूरचे ऐतिहासिक ‘राजभवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 01:03 AM2019-06-16T01:03:22+5:302019-06-16T01:05:18+5:30

उपराजधानीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे राजभवन. शहराच्या मध्यभागी सेमिनरी हिल्सच्या हिरव्यागार कुशीत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले राजभवन म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या निवासाचे स्थान. म्हणूनच त्याला ‘गव्हर्नर कुटी’ म्हणूनही ओळखले जाते. १२० वर्षापेक्षा अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेली राजभवनची वास्तू स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार राहिले आहे.

Nagpur's historic 'Raj Bhawan' | निसर्गसौंदर्याने नटलेले नागपूरचे ऐतिहासिक ‘राजभवन’

निसर्गसौंदर्याने नटलेले नागपूरचे ऐतिहासिक ‘राजभवन’

googlenewsNext
ठळक मुद्देब्रिटिश व भारतीय वास्तुशैलीचा संगम : १२० पेक्षा अधिक वर्षाचा वारसा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेले आणखी एक महत्त्वाचे स्थान म्हणजे राजभवन. शहराच्या मध्यभागी सेमिनरी हिल्सच्या हिरव्यागार कुशीत निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले राजभवन म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल अशा व्हीव्हीआयपी लोकांच्या निवासाचे स्थान. म्हणूनच त्याला ‘गव्हर्नर कुटी’ म्हणूनही ओळखले जाते. १२० वर्षापेक्षा अधिक काळाचा ऐतिहासिक वारसा लाभलेली राजभवनची वास्तू स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार राहिले आहे.
राजभवन सुरुवातीला मध्य प्रांताच्या कमिश्नरचे निवासस्थान होते. कालांतराने ते मध्य प्रांत व वऱ्हाडच्या गव्हर्नरचे निवासस्थान झाले. स्वातंत्र्यानंतर तेच जुन्या मध्यप्रदेशच्या राज्यपालांचे निवासस्थान होते व महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हेच राजभवन राज्यातील राजभवनांपैकी एक झाले. सन १९०० पूर्वी नागपूरच्या राजभवनची इमारत बांधण्यास दोन ते तीन वर्षाचा कलावधी लागल्याचे सांगण्यात येते. मध्यप्रांताचे मुख्य कमिश्नर ए. पी. मॅकडोनाल्ड हे या देखण्या इमारतीतील सर्वप्रथम निवासी होते. हे निवासस्थान कालांतराने मध्यप्रांताच्या गव्हर्नरचे गव्हर्नमेंट हाऊस म्हणून नावारुपास आले. या वास्तूने ब्रिटिश आणि भारतीय अशा वेगवेगळ्या संस्कृती जवळून पाहिल्याने तिच्या रचनेमध्ये वेगवेगळ्या वास्तुशैलीचा संगम पहावयास मिळतो. नक्षीदार कमानी, व्हरांडा, त्यातून दिसणारी बॉल रूम, मुख्य दिवाणखाना व भव्य असे भोजनकक्ष पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. नक्षीदार पर्शियन गालिचा वैभवशाली काळाची आठवण देतो. येथे येणारा प्रत्येक अतिथी स्वच्छ, सुंदर व वर्तुळाकार हिरवेगार लॉन बघून थक्क होतो. जुन्या काळातील बांधकाम असलेली भव्यदिव्य देखणी वास्तू पाहून प्रत्येकजण विस्मित होतो. या राजभवनात सुबक व कलात्मक वस्तूंचा संग्रह आहे. कोरीव लाकडी फर्निचर, क्रॉकरी, भोसले घराण्यातील राजांची व्यक्तिचित्रे, औरंगजेबाच्या काळातील असीरगड किल्ल्यावरील अष्टधातूंची भव्य तोफ, १६ व्या शतकातील गोंडराजाचे शिल्प, १३ व्या शतकातील जबलपूर येथील उत्खननात सापडलेले भगवान महावीरांचे शिल्प तसेच विविध शिल्पे व पुरातन वस्तू नकळतच गतकाळाच्या वैभवात घेऊन जातात.
राजभवन घनदाट वनराईमध्ये एका पठारावर वसविलेले आहे. म्हणूनच फळे, फुले व पक्ष्यांनी बहरलेले आहे. २०११ साली राजभवनचे मुख्य अधिकारी रमेश येवले यांच्या पुढाकाराने येथील ७० एकरामध्ये जैवविविधता उद्यानाची निर्मिती करण्यात आली. शेकडो वृक्षवेली, गुलाबांच्या अनेक प्रजाती, सुगंधी वनस्पती, वनौषधी, अलंकारिक बांबू, निवडुंब, सागवान, आंबा, डाळिंब अशा हजारच्यावर प्रजातींचे वृक्ष येथे बहरले आहेत.
स्वतंत्र फुलपाखरू उद्यानही आहे. विशेष म्हणजे संपूर्ण राजभवन परिसरात ५० पेक्षा अधिक मोरांचा मुक्त वावर असून, १४० पेक्षा अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली आहे.
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी अशा माजी  राष्ट्रपतींसह वर्तमान  राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान व राज्यपालांचेही वास्तव्य येथे झाले आहे. असे हे राजभवन सर्वांगाने सुंदर, अप्रतिम आणि राजकीय दृष्टीनेही ऐतिहासिक आहे.

Web Title: Nagpur's historic 'Raj Bhawan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर