नामांतराच्या लढ्यात नागपूरचे अतुलनीय योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 09:08 PM2020-01-13T21:08:39+5:302020-01-13T21:18:14+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठ नामांतर लढ्यात नागपूरचे मोठे योगदान राहिले आहे. महाराष्ट्रभर पेटलेल्या या आंदोलनात अनेक भीमसैनिक शहीद झाले. यात नागपूरचे भीमसैनिक मोठ्या संख्येने होते. नामांतरासाठी निघालेला ऐतिहासिक लाँग मार्च हा नागपूरच्या दीक्षाभूमीवरूनच काढण्यात आला होता. या लढ्याने पुढे चळवळीचे स्वरुप घेतले आणि ही चळवळ चालवण्यात आणि नामांतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला बाध्य करण्यातही नागपूरच्या नेतृत्वानेच महत्त्वाची भूमिका बजावली आहे, हे विशेष.
औरंगाबाद येथील मराठवाडाविद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात २७ जुलै १९७८ रोजी एकमताने मंजूर झाला आणि आंबेडकरी बौद्ध अनुयायांवर अचानक हिंसाचार वाढला. या हिसांचारच्या विरोधातील पहिली तीव्र प्रतिक्रिया उमटली ती नागपुरातच. या अत्याचाराविरोधात ४ ऑगस्ट १९७८ रोजी नागपुरात विशाल संयुक्त मोर्चा निघाला. या मोर्चातून परतणाऱ्या जमावावर इंदोरा भागात पोलिसांनी बेछुट गोळीबार केला. ४ व ५ ऑगस्ट असे दोन दिवस पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच आंदोलक शहीद झाले. नागपुरातील आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर आणि भीमसैनिकांच्या बलिदाननंतरच मराठवाड्यातील आंबेडकरी समाजावरील हिंसक हल्ले थांबले आणि तत्कालीन सरकारलाही हिंसाचार थांबविणे भाग पडले. नामांतर ठरावाच्या अंमलबजावणीसाठी १९७८-७९ अशी दोन वर्षे नागपुरात आंबेडकरी आणि पुरोगामी संघटनांनी रान उठविले होते. आंदोलनाचा एकच धडाडा लावला होता. ६ डिसेंबर १९७९ रोजी नागपुरात नामांतरासाठी स्वयंस्फूर्त असा विशाल मोर्चा निघाला होता. लाखोंच्या या मोर्चामुळे पोलीस यंत्रणेला धडकी भरली. हे आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पुन्हा गोळीबर केला. ६ व ७ डिसेंबर असे दोन दिवस तांडव सुरू होते. या दोन दिवसात आणखी चार भीमसैनिक शहीद झाले.
नामांतराच्या लढ्यात ६ डिसेंबर १९७९ रोजीचा औरंगाबाद येथील विशाल नामांतर सत्याग्रह व प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ११ नेव्हेंबर १९७९ रोजी नागपुरातून औरंगाबादसाठी काढलेला लाँगमार्च ऐतिहासिक ठरला.
मराठवाड्याच्या सीमेवर बुलडाणा जिल्ह्यात दुसरा बिडजवळ खडकपूर्णाच्या राहेरी पुलावर २७ नेव्हेंबरला लाँगमार्च अडवून प्रा. कवाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून औरंगाबाद तुरुंगात ठेवले होते. तर शेकडो भीमसैनिकांना नागपूरच्या कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. औरंगाबाद येथे ६ डिसेंबर रोजी झालेल्या सत्याग्रहात अटक करण्यात आलेल्या नागपूरच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विविध कारगृहात ठेवण्यात आले होते. असंख्य कार्यकर्ते तेव्हा नामांतरासाठी तुरुंगात होते.
६ सप्टेंबर १९८२ रोजी मुंबईत नामांतर निर्धार सत्याग्रह करण्यात आला होता. त्यातही हजारो कार्यकर्त्यांना अटक करून राज्यातील विविध कारागृहात ठेवण्यात आले होते. नामांतराच्या १९९३ च्या अंतिम लढ्यातही नागपूर पुढे होते. उत्तर नागपूरचे तत्कालीन आमदार उपेंद्र शेंडे यांनी १५ ऑगस्ट १९९३ पासून मुंबईत सुरू केलेल्या बेमुदत उपोषणामुळे नामांतर लढ्याला पुन्हा गती मिळाली. त्यानंतर मोठे आंदोलन, झालेले आत्मदहन आणि आत्माहुतीमुळे सरकारला आंबेडकरी शक्तीपुढे नमावे लागले आणि अखेर १६ वर्षाच्या अविरत संघर्षानंतर अखेर १४ जानेवरी १९९४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर ठरावाची अंमलबजावणी करावी लागली. नामांतर आंदोलनात सहभागी झालेले आणि तुरुंगवास भोगलले अनेक कार्यकर्ते आजही नागपूर व विदर्भात आहेत. त्यांना या आंदोलनात सहभागी झाल्याचा , तुरुंगवास भोगल्याचा आजही सार्थ अभिमान वाटतो.
नामांतरासाठी तुरुंगवास पत्करल्याचा सार्थ अभिमान
नामांतरासाठी औरंगाबाद येथे ६ डिसेंबर १९७९ रोजी झालेल्या सत्याग्रहात पोलिसांनी अटक केल्यानंतर १२ दिवस पुणे येथील येरवडा कारागृहात आम्हाला ठेवले होते. त्यानंतर ६ सप्टेंबर १९८२ रोजी मुंबईत झालेल्या नामांतर निर्धार सत्याग्रहात अटक करून २० सप्टेंबर १९८२ पर्यंत भायखळा (ऑर्थर रोड) कारागृहात ठेवले होते. नामांतराच्या आंदोलनात दोन वेळा तुरुंगवास पत्करावा लागला, याचा सार्थ अभिमान आहे.
अनिल वासनिक, नामांतर आंदोनातील कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते व लेखक