पुरूषी खेळात वर्चस्व मिळविलेली नागपूरची ‘आयर्न वूमन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 01:31 PM2018-11-21T13:31:26+5:302018-11-21T13:33:04+5:30
ट्रायथलॉन या खेळात पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे व ‘आयर्न मॅन’ हाच किताब विजेत्याला दिला जातो. मात्र हे वर्चस्व मोडीत काढले नागपूरच्या सुनिता धोटे यांनी.
निशांत वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : म्हणतात ना, जिद्द आणि परिश्रमाला कशाचीही तोड नाही. एका दमात २ किलोमीटर पोहल्यानंतर लगेच ९० किमीची सायकलिंग आणि पाठोपाठ २१ किमी धावण्याची हिंमतच कुणी करणार नाही. ही स्पर्धा म्हणजे ट्रायथलॉन. खरतर या खेळात पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे व ‘आयर्न मॅन’ हाच किताब विजेत्याला दिला जातो. मात्र हे वर्चस्व मोडीत काढले नागपूरच्या सुनिता धोटे यांनी. १० तासाचे हे आव्हान साडेनऊ तासात पूर्ण करणाऱ्या सुनिता यांना या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजकांकडून ‘आयर्न वूमन’ हा किताब बहाल करण्यात आला. आणि हो, दोन मुलांच्या आई असलेल्या सुनिता या ४६ वर्षाच्या आहेत, हे विशेष.
सुनिता धोटे या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचा मोठा मुलगा अभियांत्रिकीला तर लहान पॉलिटेक्निकला आहे. वायुसैनिकाची मुलगी असल्याने आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता रक्तातूनच मिळालेली. खेळाची आवड, नियमित सायकलिंग व रनिंगद्वारे त्यांनी फिटनेस सांभाळला आहे. ट्रायथलॉन या स्पर्धेबद्दल त्यांनी ऐकले होते व पुण्यातील एका महिलेने ती पूर्ण केल्याची माहिती त्यांनी होती. त्यामुळे हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार फिटनेस गुरू डॉ. अमित समर्थ, डॉ. नीना शाहू व डॉ. शाहू यांचे मार्गदर्शन घेतले. यात त्यांचे पती नितीन धोटे यांचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला.
हैदराबाद येथे ११ नोव्हेंबरला ही स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी ट्रायथलॉन स्पर्धेत १०१ स्पर्धक सहभागी होते, ज्यामध्ये सुनिता यांच्यासह केवळ दोन महिला सहभागी होत्या. सकाळी ७.३० वाजता त्यांनी स्विमिंगला सुरुवात केली.
दोन किमीचे हे अंतर १ तास ५ मिनिटात पूर्ण करून त्यांनी लगेच ९० किमीची सायकलिंग सुरू केली. त्यांच्या फिटनेसमुळे हे अंतरही त्यांनी ४.३० तासात पूर्ण केले. मात्र खरा कस लागला तो पुढच्या धावण्याच्या टास्कमध्ये. त्यांनी ताबडतोब धावणे सुरू केले.
सूर्य डोक्यावर आला होता. शरीर उत्तर देऊ लागले होते. पायात आणि पोटात क्रॅम्प येऊ लागले होते. त्यांच्या सोबतची महिला केव्हाच स्पर्धा सोडून गेली होती.
पुढे जावे की क्वीट करावे, हे विचारचक्र सुरू असताना मेंदू मात्र हार पत्करायला तयार नव्हता. काहीही करून हे अंतर पूर्ण करावे, या विचाराने शेवटचे अंतर स्वत:ला ओढतच नेल्याचे त्या सांगतात. अखेर ९.३० तासात त्यांनी तिन्ही आव्हान पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रनिंगच्या फिनिश लाईनवर कोसळताना एक अलौकिक समाधान घेऊन त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. स्टॅमिना, परिश्रम, जिद्द, संयम आणि सातत्य राखत त्यांनी विदर्भातील पहिल्या ट्रायथलॉन विजेता होण्याचा मान पटकावला.