नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 11:28 AM2022-01-24T11:28:19+5:302022-01-24T16:42:58+5:30

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय.

nagpurs lad shreenabh agrawal honoured with rashtriya bal puraskar 2021 | नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालची गगनभरारी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित

googlenewsNext
ठळक मुद्देआज ऑनलाईन कार्यक्रमात पुरस्काराचे वितरणसंशोधन क्षेत्रात नोबल पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न

नागपूर : ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’, ही म्हण नागपूरच्या श्रीनभच्या निमित्ताने खरी ठरत आहे. अगदी बालवयातच अभूतपूर्व बाैद्धिक क्षमतेने संशाेधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या श्रीनभ माैजेश अग्रवालला आज २४ जानेवारीला झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याला हा पुरस्कार डिजिटली प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्राप्त करणारा श्रीनभ पहिला नागपूरकर हाेय. संशोधन क्षेत्रात देशाला नोबल पुरस्कार मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न आहे.

केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत किशोरांना दिला जाणारा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा पुरस्कार दरवर्षी दिल्या जातो. संशोधन, साहस, समाजसेवा, कला, क्रीडा, शिक्षण आदि क्षेत्रातील अभिनव प्रयोगासाठी, नाविन्यपूर्ण उपलब्धतेसाठी हा पुरस्कार दिला जातो. उल्लेखनीय म्हणजे या पुरस्कारासाठी मागील वर्षी श्रीनभची निवड झाली हाेती. मात्र काेराेनामुळे पुरस्कार वितरण कार्यक्रम हाेऊ शकला नाही. यावर्षी एकाचवेळी सन २०-२१ व २१ - २२ या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील विविध राज्यांच्या मुलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

जिल्हाधिकारी कार्यालयातून या सोहळ्यामध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, श्रीनभचे वडील डॉ. मौजेश अग्रवाल, आई डॉ. सौ. टिनू अग्रवाल सहभागी होते. श्रीनभला हा पुरस्कार डिजीटली दिला गेला.  डिजीटल प्रमाणपत्र , १ लाख रोख रक्कम पुरस्कार विजेत्याच्या खात्यात जमा करण्यात आली.

श्रीनभने बालपणापासूनच त्याच्या बाैद्धिक क्षमतेने सर्वांनाच प्रभावित केले असून वैज्ञानिक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. श्रीनभ दहावीला असताना आयसीएससी बाेर्डाच्या परीक्षेत ९९.९ टक्के गुण मिळवून ऑल इंडिया रॅंकमध्ये तिसरा हाेता. बारावीच्या परीक्षेतही त्याने गुणवत्ता मिळविली. यासह किशाेर वैज्ञानिकाच्या परीक्षेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली. श्रीनभचा आयआयटीला नंबर लागला हाेता पण संशाेधनाच्या क्षेत्रात कार्य करून नाेबेल पुरस्काराची इच्छा बाळगणाऱ्या श्रीनभने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूरूची निवड केली. त्याने लहान वयातच वैज्ञानिक क्षेत्रात ओळख निर्माण केली आहे.

त्याने स्वत: दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रीपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’ वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे. ‘आयआयटी कानपूरचे’ भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रमदेखील त्याने पूर्ण केले आहेत. याशिवाय कमी वयात पुस्तक लिखाणसंदर्भात इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि चिल्ड्रन बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये देखील त्याच्या नावाची नोंद आहे.

श्रीनभ सध्या इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बंगलोर येथे प्रथम वर्षात (बीएस/रिसर्च) शिक्षण घेत आहे. जिल्हा प्रशासनातर्फे त्याला आज पुरस्कार प्राप्तीनंतर भेटवस्तू देऊन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सन्मानित केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना श्रीनभने संशोधन क्षेत्रात नोबेल पुरस्कार देशाला मिळवून देण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.

जन्मापासूनचा घटनाक्रम डाेळ्यासमाेर आला

हा पुरस्काराचा आनंद शब्दात सांगता येणारा नाही. यानिमित्ताने श्रीनभच्या जन्मापासूनचा घटनाक्रम डाेळ्यासमाेरून जात आहे. श्रीनभ लहानपणापासूनच समर्पित वृत्तीने अभ्यास करणारा राहिलेला आहे. एखादी माेठी कामगिरीही त्याला विचलित करीत नाही. शांत राहून पुढे जाण्याची त्याची वृत्ती आहे. म्हणूनच आयआयटी साेडून संशाेधनाच्या क्षेत्रात जाण्याच्या इच्छेला आम्ही पाठिंबा दिला. त्याला देशासाठी काही करायचे आहे, याचा आईवडील म्हणून आम्हाला गर्व आहे.

- टिनू माैजेश अग्रवाल, आई

Web Title: nagpurs lad shreenabh agrawal honoured with rashtriya bal puraskar 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.