स्वयंचलित मीटर वाचनात नागपूरची आघाडी
By admin | Published: April 11, 2017 02:20 AM2017-04-11T02:20:37+5:302017-04-11T02:20:37+5:30
आपण वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेत बिल मिळावे, अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असते.
महावितरण : वीज बिलात अचूकता
नागपूर : आपण वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेत बिल मिळावे, अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने सुरुवातीपासूनच अद्ययावत पद्धतीचे अचूक मीटर रीडिंग व्हावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन प्रयोगांची अंमलबजावणी केली आहे. यापैकी सर्वाधिक नवीन तंत्रज्ञान असलेल्या स्वयंचलित मीटर वाचन (एएमआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नागपूर परिक्षेत्राने राज्यात आघाडी घेतली आहे.
महावितरणने राज्यातील उच्च दाब ग्राहकांसाठी स्वयंचलित मीटर वाचनाद्वारे (एएमआर) बिलिंग यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात अचूकता आली आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाच परिमंडलाचा समावेश असून, ही पाचही परिमंडल मिळून एकूण २५५१ उच्च दाब ग्राहक आहेत. यापैकी मार्च २०१७ च्या वीज वापरापोटी २,१९५ ग्राहकांकडील मीटरचे वाचन स्वयंचलित झाले असून हे प्रमाण तब्बल ८६ टक्के आहे, तर त्याखालोखाल औरंगाबाद परिक्षेत्रातील प्रमाण ७६.८ टक्के, कल्याण परिक्षेत्रात ७५.१ टक्के तर पुणे परिक्षेत्रात हे प्रमाण ७४.९ टक्के आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी २ आॅक्टोबर २०१६ रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आधुनिकीकरण आणि अचूकता यावर विशेष भर दिला आणि त्यामुळेच नागपूर परिक्षेत्राने राज्यात स्वयंचलित मीटर वाचन यंत्रणेच्या वापरात राज्यात आघाडी घेतली आहे. याशिवाय नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी आणि अकोला परिमंडलाचे वर्तमान मुख्य अभियंता अरविंद भादीकर व पूर्वीचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी त्यांच्या परिमंडलातील अधीक्षक अभियंते आणि चाचणी मंडलाचे अधीक्षक अभियंता बंडू वासनिक यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले.(प्रतिनिधी)
बिलिंगमध्येही नागपूर परिक्षेत्र पुढे
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील उच्च दाब ग्राहकाकडील मीटरचे वाचन दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी होऊन पुढील पाच दिवसात त्यांचे बिलिंग होऊन ते ग्राहकांच्या ई-मेलवर मिळायलाच हवे यावर काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्याने ३१ मार्च रोजी मीटर वाचन करून ५ एप्रिलपर्यंत सर्व ग्राहकांना त्यांचे वीज देयक ई-मेल च्या माध्यमातून पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार मार्च महिन्याच्या बिलिंगमध्ये नागपूर परिक्षेत्राने सर्व २५५१ ग्राहकांचे बिंलिंग यशस्वीरीत्या करीत राज्यात आघाडी घेतली आहे. नागपूरपाठोपाठ पुणे परिक्षेत्राने ९९.८९ टक्के, औरंगाबाद परिक्षेत्राने ९९.३८ तर कल्याण परिक्षेत्राने ९८.९७ टक्के ग्राहकांचे बिलिंग केले आहे.