नागपूरच्या ‘एलआयटी’ला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 11:54 AM2018-08-24T11:54:01+5:302018-08-24T11:56:22+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय पातळीहून हालचाली सुरू झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संचालित व देशातील नामांकित रासायनिक अभियांत्रिकी संस्था असलेल्या ‘एलआयटी’ला (लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रीय पातळीहून हालचाली सुरू झाल्या आहेत. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना गुरुवारी यासंदर्भात चर्चेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे बोलविण्यात आले होते.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या निर्देशांवरुन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुलगुरूंशी चर्चा केली व या प्रस्तावासंदर्भात सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नालॉजी ही नागपुरातील जुन्या अभियांत्रिकी संस्थांपैकी एक आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये या संस्थेच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली. मुंबईचे आयसीटी,व्हीजेटीआय, पुण्याचे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, नांदेडचे एसजेजीएस, कराड तसेच अमरावतीचे अभियांत्रिकी महाविद्यालये यांना स्वायत्तता मिळाल्यानंतर त्यांचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे ‘एलआयटी’ला स्वायत्तता मिळावी अशी मागणी शिक्षणक्षेत्रातून होत आहे. मात्र प्रत्यक्षात ‘एलआयटी’मध्ये प्राध्यापकांची सुमारे ३२ पदे रिक्त आहेत. शिवाय सर्व विभागांचे ‘एनबीए’ मूल्यमापनदेखील झालेले नाही. अशा स्थितीत स्वायत्तता मिळणे अडचणीचे जाणार आहे.
त्यामुळे ‘एलआयटी’च्या विकासासाठी याला ‘डीम्ड’ विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार समोर आला होता. याबाबतीत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशीदेखील कुलुगुरुंची अगोदरदेखील चर्चा झाली होती.
कुलगुरू व मनुष्यबळ विकास मंत्रालयातील अधिकाऱ्यांची ‘एलआयटी’संदर्भात सखोल चर्चा झाली. सोबतच यासंदर्भात नेमक्या कुठल्या तांत्रिक मुद्यांची पूर्तता करणेदेखील आवश्यक असेल यावरदेखील बोलणे झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान कुलगुरुंशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
तर ‘एलआयटी’चा होईल कायापालट
जर ‘एलआयटी’ला ‘डीम्ड युनिव्हर्सिटी’चा दर्जा मिळाला तर संस्थेला मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकेल. संस्थेच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी प्राप्त होऊ शकतो व या माध्यमातून संस्थेचा पूर्णपणे कायापालट शक्य होऊन तेथे जागतिक सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात. सोबतच रिक्त पदांची समस्यादेखील दूर होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दर्जेदार संशोधनाला चालना मिळेल.