नागपूरचे यकृत मुंबईला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:34 AM2017-10-17T00:34:22+5:302017-10-17T00:34:40+5:30

दीक्षित कुटुंबीयांनी वेळेवर घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे रविवारी तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली.

Nagpur's liver leaves for Mumbai | नागपूरचे यकृत मुंबईला रवाना

नागपूरचे यकृत मुंबईला रवाना

Next
ठळक मुद्देग्रीन कॉरिडोरमधून चार मिनिटांचा प्रवास : दीक्षित कुटुंबीयांच्या पुढाकाराने तिघांना जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दीक्षित कुटुंबीयांनी वेळेवर घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे रविवारी तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. विशेष म्हणजे, सोमवारी दुपारी ग्रीन कॉरिडोरमधून केवळ चार मिनिटात नागपूर येथून यकृत मुंबईला रवाना झाले. विदर्भातील हे २२ वे ‘कॅडेवर डोनर’ ठरले.
खामला येथील रहिवासी संजीव दीक्षित (६४) रविवारी सकाळी घरी बाथरुममध्ये पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यांना शंकरनगर चौकातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू केले. परंतु मेंदूमध्ये रक्तस्राव वाढल्याने उपचाराला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून ‘ब्रेन डेड’ घोषित केले. दीक्षित कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यास्थितीतही त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. रुग्णालयाने याची माहिती विभागीय प्रत्यारोपण समितीला दिली. समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी व सचिव डॉ. रवी वानखेडे यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. यामुळे रविवारी वोक्हार्ट हॉस्पिटलमधील ६५ वर्षीय एका महिलेला तर केअर हॉस्पिटलमधील एका ६४ वर्षीय पुरुषाला मूत्रपिंड दान करण्यात आले. ही शस्त्रक्रिया वोक्हार्टचे यूरोलॉजिस्ट व मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. सूर्यश्री पांडे यांनी केली. तर रविवारी विशेष विमानाने यकृत मुंबई येथील ग्लोबल हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. येथील ५८ वर्षीय पुरुषावर हे यकृत प्रत्यारोपण केले. ही शस्त्रक्रिया यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. रवी मोहनक यांनी केली.

Web Title: Nagpur's liver leaves for Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.