उत्तराखंडमध्ये अडकलाय नागपूरचा मेकअपमन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:29 PM2020-04-27T22:29:53+5:302020-04-27T22:30:13+5:30
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असलेली मंडळीही तिथेच अडकली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे सारे जग जागच्या जागी थांबले आहे. कल्पनाविश्वात रममाण करून साऱ्यांना खिळवून ठेवणारे चित्रपट उद्योग क्षेत्रही लॉक झाले आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण सुरू होते. तेही रखडले आहे आणि चित्रिकरणात व्यस्त असलेली मंडळीही तिथेच अडकली आहे. अशाच चित्रीकरणाच्या स्पॉटवर नागपूरचा रंगभूषाकार (मेकअपमॅन) अडकला आहे.
रामजी व नकुल श्रीवास बंधू हे नागपुरातील प्रख्यात मेकअप आर्टिस्ट आहेत. नागपूरसह मुंबई व दक्षिण चित्रपट क्षेत्रातून त्यांची मागणी असते. शिवाय, मॉडेलिंगमध्येही मेकअपमॅन म्हणून त्यांना आवर्जुन बोलावले जात असते. या बंधंूपैकी लहान असलेले नकुल हे उत्तराखंड येथील बेरीनाग येथे अडकले आहेत. त्यांच्यासोबत चित्रपटातील तांत्रिक बाजू सांभाळणारे कलावंतही तेथेच आहेत. असे आठ-दहा जण बेरीनाग येथील एका लॉजवर एकाच रूममध्ये आहेत. विशेष म्हणजे निमार्ताही तेथेच असून, त्याच्याकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे ही संपूर्ण मंडळी सांगत आहे. त्यामुळे, या कलावंतांवर उपासमारीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही मंडळी आपापल्या भागातील सहकारी कलावंतांकडून मदत मागून येणारा दिवस काढत आहेत. नकुल यांच्यासह मुंबईची असलेले हे सारे कलावंत लवकरात लवकर आपल्या गृहनगरात परतण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, कुठूनही त्यांना मदत मिळत नसल्याचे दिसून येत आहे.
७ मार्चपासून अडकलोय - नकुल श्रीवास
: ७ मार्चपासून तमिळ चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मेकअपमॅन म्हणून बेरीनाग येथे संपूर्ण क्रूसोबत आलो. काही दिवस चित्रिकरण सुरू असतानाच २२ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून चित्रपटाचे दिग्दर्शक निशाद भारद्वाज व इतर कु्र मेंबर्ससोबत लॉजमध्ये अडकून पडलो आहोत. निर्माते सिद्धू पुजारी हे सुद्धा येथेच एका हॉटेलमध्ये आहेत. मात्र, ते कोणतही मदत करित नसल्याचे नकुल श्रीवास यांनी सांगितले. अ.भा. मराठी चित्रपट महामंडळाकडूनही कुठलेही सहकार्य झाले नाही. चित्रपट मराठी नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांचे म्हणने आहे. जवळचा पैसा संपला आहे. सगळेच क्रु मेंबर्स एकमेकांच्या आधाराने जगत आहेत. नागपुरातून संजय भाकरे, आसिफ बक्षी, दीपाली घोंगे, आसावरी रामेकर या सहकारी कलावंतांनी केलेल्या मदतीमुळे थोडा आधार प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.