नागपूरचा पारा ४२ अंशावर! अकाेला सर्वाधिक ४४.५ डिग्री ,रात्रीची घसरण कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 06:14 AM2023-05-13T06:14:30+5:302023-05-13T06:15:17+5:30
नागपूरचाही पारा हळूहळू वाढत ४२ अंशावर पाेहचला आहे.
नागपूर :तापमानाने अद्यापतरी तापमानाची सरासरी गाठली नसली तरी उन्हाच्या झळांनी नागरिकांचा त्रास वाढला आहे. शुक्रवारी अकाेल्यात सर्वाधिक ४४.५ अंश तापमानाची नाेंद करण्यात आली. नागपूरचाही पारा हळूहळू वाढत ४२ अंशावर पाेहचला आहे. अद्याप सरासरीपेक्षा कमी असला तरी उन्हाचे चटके वाढले आहेत.
बंगालच्या खाडीत तयार झालेले माेखा चक्रीवादळ आता म्यानमार आणि बांगलादेशकडे वळले असून रात्रभरात ते अधिक धाेकादायक ठरणार असण्याची शक्यता आहे. १४ मे पर्यंत त्याची सक्रियता कायम राहणार आहे. मात्र सध्यातरी मध्य भारत आणि आसापास चक्रीवादळाचा प्रभाव नाही. तापमान मात्र संथगतीने वाढत आहे. हवामान खात्याने पुढचे काही दिवस तापमान वाढीचा अंदाज दिला आहे. वर्धा येथे पारा ४३.४ अंशावर गेला आहे तर नागपूरसह गाेंदिया, अमरावती, यवतमाळमध्ये ४२ अंशावर पाेहचले आहे. नेहमी तापदायक असलेल्या चंद्रपूरला मात्र अद्याप पारा चढलेला नाही.
दिवसाचा पारा वाढत असला तरी रात्रीच्या तापमानात आश्चर्यकारकरित्या घसरण हाेत आहे. शुक्रवारी नागपूरला रात्रीचा पारा सरासरीपेक्षा ६.५ अंशाने कमी हाेता व २१ अंश नाेंद झाली. गाेंदियात सर्वात कमी १९.८ अंश आहे, जे सरासरीपेक्षा ७.२ अंशाने कमी आहे. दिवस आणि रात्रीचे तापमान केवळ अकाेल्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक आहे.