नागपूरची मेट्रो रेल्वे फेबुवारीअखेर धावण्यासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 09:14 PM2019-02-12T21:14:38+5:302019-02-12T22:16:42+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डी, मुंजे चौकापर्यंत १३ कि.मी. आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत फेब्रुवारीअखेर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण कार्यक्रमासाठी येण्याची माहिती आहे. याकरिता या मार्गावरील अपूर्ण असलेल्या कामासाठी मेट्रोची चमू वेगाने कार्य करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत रिच-१ मध्ये खापरी ते सीताबर्डी, मुंजे चौकापर्यंत १३ कि.मी. आणि रिच-३ मध्ये लोकमान्यनगर ते सुभाषनगरपर्यंत फेब्रुवारीअखेर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकार्पण कार्यक्रमासाठी येण्याची माहिती आहे. याकरिता या मार्गावरील अपूर्ण असलेल्या कामासाठी मेट्रोची चमू वेगाने कार्य करीत आहे.
खापरी ते सीताबर्डीपर्यंत सहा स्टेशनपैकी चार स्टेशन पूर्ण झाले असून दोन स्टेशनचे काम वेगात सुरू आहे. मंगळवारी मेट्रोने पत्रकारांसाठी सीताबर्डी, मुंजे चौकातील इंटरचेंज स्टेशनच्या बांधकामाची पाहणी करण्यासाठी दौऱ्याचे आयोजन केले. महामेट्रो प्रकल्प संचालक महेशकुमार अग्रवाल यांनी सांगितले की, या स्टेशनवर जवळपास २.५ लाख चौरस फूट जागेत बांधकाम करण्यात येत आहे. रूळ टाकण्याचे काम सुरू आहे. दहा स्टेशनचे बांधकाम एकाच स्टेशनवर होत आहे. त्याकरिता विशेष परिश्रम घेत आहे. व्यावसायिक रन सुरू होण्यासाठी स्टेशनवर ३५० कर्मचारी दिवसरात्र काम करीत आहेत. या स्टेशनवर पाच मजली बांधकाम करण्यात येणार आहे. त्यातील एक मजला व्यावसायिक राहील. मेट्रोचा व्यावसायिक रन सुरू राहिल्यानंतरही स्टेशनवर बांधकाम रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत सुरू राहील.
२५ मीटर उंचीवरून मेट्रो धावणार
इंटरचेंज स्टेशनवर पूर्व-पश्चिम जाणारी मेट्रो उत्तर-दक्षिण मार्गापेक्षा ९ मीटर उंचीवरून अर्थात जवळपास २५ मीटर उंचीवरून धावणार आहे. या ठिकाणी प्रवाशांना हव्या त्या मार्गावर जाण्यासाठी अत्याधुनिक सेवा उपलब्ध राहणार आहे. धंतोली स्टेशनवर ट्रक लिकिंगचे काम सुरू आहे. मेट्रोने जानेवारीमध्ये ६५०० मीटर लांबीचे रूळ टाकले आहे. खापरी ते सीताबर्डी मार्गावर आतापर्यंत अप-डाऊन मार्गावर २६ हजार मीटर लांब रूळ टाकले आहे तर रिच-३ मध्ये ९ हजार मीटर लांबीचे रूळ टाकले असून पुढील आठवड्यात ३ हजार मीटर लांब रूळ टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत झिरो माईल्सपर्यंत मेट्रो सुरू होणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.
१२० मीटरचे वळण
जेल रोडवर मेट्रोचे १२० मीटरचे वळण राहणार आहे. त्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधकाम केले आहे. एका बाजूला उंचवटा आणि विशेष आधार दिल्यामुळे मेट्रोला सहजपणे धावणे शक्य होणार आहे. या प्रसंगी महामेट्रोच्या रिच-१ चे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेकर उपस्थित होते.
आदिवासी गोवारी पुलावर स्टील गर्डर ब्रिजचे काम
महामेट्रोच्या सीताबर्डी ते आॅटोमोटिव्ह चौकापर्यंतच्या रिच-२ मध्ये व्हेरायटी चौकाजवळील शहीद आदिवासी गोवारी उड्डाण पुलावर स्टील गर्डर ब्रिजचे काम सुरू आहे. एक स्टील गर्डर बांधकाम पूर्ण झाले असून तीनचे बांधकाम सात दिवसात पूर्ण होणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. स्टील गर्डर ब्रिजचे काम जमिनीपासून १८.५ मीटर उंचीवर सुरू आहे. मेट्रोच्या दोन पिलरवर एकूण ४०० मीटर लांबीच्या स्पॅनसाठी ४०० आणि २०० मेट्रिक टन क्षमतेच्या दोन क्रेनचा उपयोग करण्यात येत आहे. या कामात लोखंडाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्यामुळे अपघाताची जास्त शक्यता असते. त्यामुळे पोलिसांच्या वाहतूक विभागाने उड्डाण पूल अस्थायी स्वरुपात बंद करण्याची परवानगी दिली आहे. जवळपास सात दिवसात काम पूर्ण झाल्यानंतर उड्डाण पुलावरून वाहतूक पुन्हा सुरू होणार आहे. व्हेरायटी चौकात मॉल, प्रतिष्ठाने, शॉपिंग स्ट्रीट, सिटी बस स्टॉपमुळे लोकांची गर्दी असते. वाहतुकीसाठी अडचण होऊ नये म्हणून मेट्रोचे ट्रॉफिक मार्शल आणि क्यूआर चमू चौकात कार्यरत आहे. या ठिकाणचे कार्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत सुरू असल्याचे महेशकुमार यांनी सांगितले.