नागपुरातले आमदार निवास निव्वळ नावापुरतेच; तिथे मुक्काम स्वीय सचिव व कार्यकर्त्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 09:54 PM2017-12-11T21:54:17+5:302017-12-11T21:56:25+5:30

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अख्खे सरकार गावात आहे. त्यांच्यासोबतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारही दाखल झाले आहेत. या आमदारांच्या निवासाची व्यवस्था सिव्हिल लाईन्समधील आमदार निवासात करण्यात आली आहे. परंतु या आमदार निवासाला ९० टक्के आमदारांनी पाठ दाखविली आहे.

Nagpur's MLA hostel only for the name; secretary and the volunteers stay their | नागपुरातले आमदार निवास निव्वळ नावापुरतेच; तिथे मुक्काम स्वीय सचिव व कार्यकर्त्यांचा

नागपुरातले आमदार निवास निव्वळ नावापुरतेच; तिथे मुक्काम स्वीय सचिव व कार्यकर्त्यांचा

Next
ठळक मुद्दे९० टक्के आमदारांचा टाटा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचाच भरणा

गणेश खवसे ।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली. अख्खे सरकार गावात आहे. त्यांच्यासोबतच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदारही दाखल झाले आहेत. या आमदारांच्या निवासाची व्यवस्था सिव्हिल लाईन्समधील आमदार निवासात करण्यात आली आहे. परंतु या आमदार निवासाला ९० टक्के आमदारांनी पाठ दाखविली आहे. आमदार निवासाऐवजी थ्री-स्टार, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आमदारांनी मुक्काम ठोकला असल्याची बाब ‘लोकमत’ने सोमवारी केलेल्या पाहणीत आढळून आली. आमदारांच्या नावाने बुक असलेल्या खोल्यांमध्ये त्यांचे स्वीय सचिव (पी.ए.) आणि कार्यकर्ते आराम फर्मावत होते. दुसरीकडे काही आमदारांनी आमदार निवासातच राहण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
हिवाळी अधिवेशनानिमित्त येणाऱ्या आमदारांची निवासाची व्यवस्था आमदार निवासात करण्यात येते. यासाठी तीन विंगमध्ये तब्बल ३१२ खोल्यांची व्यवस्था आहे. मात्र ‘आमदार निवासा’चा फेरफटका मारला असता तेथे केवळ पी. ए. आणि कार्यकर्त्यांचीच फौज दिसून आली. नियमित मुक्काम करणारे निवडक आमदार वगळता सर्वच आमदार हे बाहेर मुक्कामी राहणे पसंत करतात. त्यातही विशेष म्हणजे नागपुरातील छोट्या ९३ हॉटेलमध्ये ते राहात नसून थ्री-स्टार, फाईव्ह स्टार अशा बड्या हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. यामुळे आमदार निवासात सोयी - सुविधा नाहीत काय, असा प्रश्न उपस्थित होतो. दुसरीकडे तेथे सोयी-सुविधा नसल्यास मग पी.ए. आणि कार्यकर्त्यांना तरी आमदार निवासात कशाला ठेवले जाते, असाही प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.
दिग्गज माजी मंत्री, दिग्गज नेते असणाऱ्या सर्वच आमदारांच्या नावाने आमदार निवासातील खोल्या बुक आहेत. त्यात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, दिलीप वळसे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयदत्त क्षीरसागर, सुनील तटकरे, राजेश टोपे, भास्कर जाधव अशा सर्वांच्याच नावाने खोल्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परंतु त्यातील एकाही खोलीमध्ये हे दिग्गज नेते राहात नाही. त्यांच्या खोल्यांमध्ये एकतर पी.ए. किंवा कार्यकर्तेच मुक्काम करीत असल्याचे वास्तव आहे. ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यासह इतर निवडक काही आमदार मात्र अधिवेशन काळात नियमितपणे आमदार निवासातच मुक्काम करतात.
अशाप्रकारे ‘उपयोग’ करून घेण्याबाबत एका आमदारांशी संपर्क साधला असता दुरून येणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगली व्यवस्था करणे, ही आमची जबाबदारी असल्याने त्यांना तेथे राहण्याची सुविधा उपलब्ध करून देतो, असे सांगितले.

ज्येष्ठ आमदारांची पसंती
आमदार निवासात मुक्काम करण्याऐवजी थ्री-स्टार, फाईव्ह स्टारला बहुतांश आमदार हे पसंती दर्शवितात. मात्र काही दिग्गज, ज्येष्ठ आमदार परंपरेप्रमाणे अजूनही आमदार निवासांतच मुक्काम करतात. यात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. त्यांची व्यवस्था इमारत क्र. १ च्या खोली क्र. १३ मध्ये करण्यात आली आहे. अधिवेशनाचे कामकाज आटोपताच ते आपल्या खोलीवर दाखल झाले. याशिवाय सुरगाना (जि. नाशिक) येथील आ. जीवा गावितही आमदार निवासात आले. याव्यतिरिक्त आणखी निवडक आमदार वगळले तर कुणीही आमदार या निवासाकडे फेरफटकाही मारत नाही.

महिला आमदारही दूरच
हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या बहुतांश महिला आमदारांची पसंती आमदार निवासाला असते. मात्र यावर्षी या महिला आमदारांनीही आमदार निवासाला पाठ दाखविली असल्याची बाब ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आली. सर्व महिला आमदारांच्या निवासाची व्यवस्था इमारत क्र. १ मधील दुसऱ्या माळ्यावर करण्यात आली आहे. वर्षा गायकवाड, माधुरी मिसाळ, संध्यादेवी देसाई - कुपेकर, प्रणिती शिंदे, अ‍ॅड. यशोमती ठाकूर, डॉ. नीलम गोºहे, स्नेहलता कोल्हे, मनीषा चौधरी, संगीता ठोंबरे, निर्मला गावित, देवयानी फरांदे, विद्या चव्हाण, सुमन पाटील, मंदा म्हात्रे, मेघा कुलकर्णी, सीमा हिरे, भारती लव्हेकर, मोनिका राजाळे, दीपिका चव्हाण, अमिता चव्हाण, तृप्ती सावंत, हुस्नबानू खलिफे, स्मिता वाघ आदी महिला आमदारांचा यामध्ये समावेश आहे. मात्र त्या आमदारांच्या खोल्यांनाही कुलूप लागलेले आहेत.

भुजबळांचा मुक्काम नेमका कुठे?
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे सध्या एका प्रकरणामुळे तुरुंगात आहे. ते विद्यमान आमदार असल्याने त्यांच्याही नावावर आमदार निवासात इमारत क्र. १ मधील १०४ क्रमांकाची खोली उपलब्ध करण्यात आली आहे. आमदारांची खोली क्रमांक दर्शविणाऱ्या फलकावरही १०४ खोली क्रमांकापुढे त्यांचे नोंदविण्यात आले आहे. मात्र हा फलक पाहताना छगन भुजबळ यांचे नाव दिसताच ते बाहेर तर आले नाही ना, असा काहीसा प्रश्न पडतो. त्यातच त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांच्या नावाने ३०९ क्रमांकाची खोली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ती खोली मात्र पाहणीदरम्यान कुलूपबंद आढळून आली.

स्थानिक आमदारांच्या खोल्यांना ‘लॉक’
नागपूर शहर आणि जिल्ह्यातील आमदारांच्या नावानेही आमदार निवासात खोल्या बुक आहेत. जोगेंद्र कवाडे (इमारत क्र. १ - खोली क्र. ६), सुधाकर कोहळे (इमारत क्र. २ - खो. क्र. १४६), डी. एम. रेड्डी (२४३), नागो गाणार (३६०), आशिष देशमुख (४५३), सुनील केदार (४६४), कृष्णा खोपडे (इमारत क्र. ३ - खो. क्र. ६१), समीर मेघे (६२), सुधाकर देशमुख (६७), सुधीर पारवे (७६), विकास कुंभारे (१७४), डॉ. मिलिंद माने (१८०), प्रकाश गजभिये (२७१), अनिल सोले (२७९) आणि आ. डॉ. परिणय फुके यांच्या नावाने इमारत क्र. १ मध्ये १०५ क्रमांकाची खोली उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील हे सर्वच आमदार त्यांच्या निवासस्थानीच मुक्काम करतात तर जिल्ह्यातील आमदार हे अप-डाऊन करतात. परंतु असे असताना त्यांच्या नावानेही खोल्या उपलब्ध असून कार्यकर्त्यांचा तेथे मुक्काम आहे.


सुविधांची कमतरता
आमदार निवासात सुख-सुविधांची कमतरता जाणवते. स्वच्छतेचा अभाव आहे, गाद्या व्यवस्थित नाही. सुविधांची मागणी केल्यावर ती पुरविली जाते. जेवणाचाही दर्जा खालावला आहे. जेवण केल्यानंतर त्रास सुरू झाला. इतर काळात हे आमदार निवास दुसऱ्यांना दिले जाते. त्यामुळे येथे बऱ्याच समस्या निर्माण झालेल्या आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. समस्या असल्यानेच घरी चांगल्या सुविधा उपलब्ध असणारे आमदार या निवासात राहतील तरी कशाला? त्यामुळे नाईलाजास्तव ते बड्या हॉटेलकडे वळतात.
- जीवा पांडू गावित,
आमदार, सुरगाणा (जि. नाशिक)

Web Title: Nagpur's MLA hostel only for the name; secretary and the volunteers stay their

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.