नागपूरकर मोहम्मदचा अनोखा ‘फ्लाईंग रेकॉर्ड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 01:28 AM2019-01-17T01:28:13+5:302019-01-17T01:29:51+5:30
विमान... दळणवळणाचे असे साधन ज्याचे सर्वांनाच लहानपणापासूनच आकर्षण असते. लहानपणी खेळण्यांमध्ये, प्रदर्शनांमध्ये विमानांकडे मुले सर्वात जास्त प्रमाणात खेचल्या जातात. त्यालादेखील विमानांनी अशीच भुरळ घातली होती. विमानांसारखी उंच झेप घेण्याचे स्वप्न त्याने लहानपणीच पाहिले अन् जिद्दीच्या बळावर त्याच्या स्वप्नांना पंखदेखील मिळाले. ज्या वयात मुले विमान ‘पायलट’ होण्याचे स्वप्न बघू लागतात, त्या वयात त्याने सर्वांना अचंबित करणारी कामगिरी करून दाखविली आहे. अवघ्या चौदाव्या वर्षी ‘सोलो’ म्हणजेच एकट्याने विमानाचे उड्डाण करून मोहम्मद फैजी या भारतीय मुलाने एक आदर्शच प्रस्थापित केला आहे. मूळचा नागपूरकर असलेला मोहम्मद सद्यस्थितीत कुटुंबीयांसमवेत कॅनडातील टोरांटो येथे वास्तव्यास आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमान... दळणवळणाचे असे साधन ज्याचे सर्वांनाच लहानपणापासूनच आकर्षण असते. लहानपणी खेळण्यांमध्ये, प्रदर्शनांमध्ये विमानांकडे मुले सर्वात जास्त प्रमाणात खेचल्या जातात. त्यालादेखील विमानांनी अशीच भुरळ घातली होती. विमानांसारखी उंच झेप घेण्याचे स्वप्न त्याने लहानपणीच पाहिले अन् जिद्दीच्या बळावर त्याच्या स्वप्नांना पंखदेखील मिळाले. ज्या वयात मुले विमान ‘पायलट’ होण्याचे स्वप्न बघू लागतात, त्या वयात त्याने सर्वांना अचंबित करणारी कामगिरी करून दाखविली आहे. अवघ्या चौदाव्या वर्षी ‘सोलो’ म्हणजेच एकट्याने विमानाचे उड्डाण करून मोहम्मद फैजी या भारतीय मुलाने एक आदर्शच प्रस्थापित केला आहे. मूळचा नागपूरकर असलेला मोहम्मद सद्यस्थितीत कुटुंबीयांसमवेत कॅनडातील टोरांटो येथे वास्तव्यास आहे.
मोहम्मदला लहानपणापासून विमानांचे आकर्षण होते. त्याच्या मोठ्या बहिणीकडे खासगी विमान चालविण्याचा परवाना असल्यामुळे त्याची आवड आणखी वाढली. दहाव्या वर्षीपासूनच त्याने विमान चालविण्याचे धडे घेण्यास सुरुवात केली. बाराव्या वर्षी व्हॅन्कोव्हर येथे त्याने ‘इन्स्ट्रक्टर’सोबत पहिल्यांदा विमान उडविले. त्यानंतर त्याने टोरांटोमध्येच विमान उडविण्याचे धडे घेतले. चौदाव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर त्याने ‘रेडिओ सर्टिफिकेट’ परीक्षा, वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली. कॅनडामध्ये ‘सोलो फ्लार्इंग’चा परवाना १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळतो. चौदावा वाढदिवस झाल्यानंतर मोहम्मदला लगेच परवाना मिळाला. त्यानंतर लागलीच डिसेंबर महिन्यात त्याने कॅलेडॉन येथील ब्रॅम्प्टन फ्लाईंग क्लब येथून ‘सोलो पायलट’ म्हणून विमान उडविले. मोहम्मदची आई जुमाना फैजी या नागपूरच्या आहेत. टोरांटो येथे स्थायिक झाले असले तरी मोहम्मदची नाळ अद्यापही नागपूरशी जुळली आहे.
‘गिनीज’चा ‘रेकॉर्ड’ मोडल्याचा दावा
सर्वात कमी वयात ‘सोलो पायलट’ म्हणून विमान उडविल्याचा ‘रेकॉर्ड’ हा लॉस एंजेलिस येथील जोनाथन स्ट्रीकलॅन्ड याच्या नावावर होता. त्याने १४ वर्ष ४ महिने वयाचा असताना विमान उडविले होते. मात्र मोहम्मदने १४ वर्ष ६ दिवस वयातच ही कामगिरी केली आहे. आम्ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’साठी दावा करणार आहोत, अशी माहिती मोहम्मदची आई जुमाना फैजी यांनी दिली. नागपूरवर त्याचे विशेष प्रेम असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.