नागपूरच्या नंदनवन पोलिसांनीच मारला २.५५ कोटींवर हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 12:50 AM2018-05-03T00:50:33+5:302018-05-03T00:50:49+5:30

नंदनवन पोलिसांनी हवालाच्या कारमधून २ कोटी ५५ लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सातारा पोलिसांनी यात पोलिसांना मदत करणाऱ्या चार आरोपींना महाबळेश्वरमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेतील २ लाख ८२ हजार रुपये आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीसांच्या मदतीने ही लूट केल्याची बाब आरोपींनी कबूल केली आहे. या कबुलीनाम्यामुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध कोणत्याही क्षणी लुटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Nagpur's Nandanawan police grabbed 2.55 crore! | नागपूरच्या नंदनवन पोलिसांनीच मारला २.५५ कोटींवर हात !

नागपूरच्या नंदनवन पोलिसांनीच मारला २.५५ कोटींवर हात !

Next
ठळक मुद्देसातारा पोलिसांनी चौघांना पकडताच बिंग फुटले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नंदनवन पोलिसांनी हवालाच्या कारमधून २ कोटी ५५ लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सातारा पोलिसांनी यात पोलिसांना मदत करणाऱ्या चार आरोपींना महाबळेश्वरमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेतील २ लाख ८२ हजार रुपये आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीसांच्या मदतीने ही लूट केल्याची बाब आरोपींनी कबूल केली आहे. या कबुलीनाम्यामुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध कोणत्याही क्षणी लुटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नंदनवन पोलिसांनी २६ एप्रिलला रात्री प्रजापती चौकात डस्टर क्रमांक एम. एच. ३१/ एफ. ए. ४६११ मध्ये ३ कोटी १८ लाख रुपये जप्त केले होते. ही रक्कम रायपूरवरून नागपूरला आणण्यात येत होती. या कारवाईनंतर सिव्हील लाईन्सच्या मनीष खंडेलवाल नावाच्या युवकाने डस्टरमधून २.५५ कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप लावला होता. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली होती. खंडेलवालने २८ एप्रिलला रायपूरच्या मॅपल ज्वेलर्सच्या अली जीवानी नावाच्या व्यक्तीने रक्कम पळविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या कारवाईत नंदनवन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे, उपनिरीक्षक कृष्णा सोनुले, शिपाई सचिन भजभुजे यांनी कारवाई केली होती. कारवाई दरम्यान पोलिसांसोबत आरोपी सचिन पडगिलवार आणि रवी माचेवारही हजर होते. प्रजापतीनगरात डस्टरला थांबविल्यानंतर पोलिसांनी त्यातील नवनीत जैन आणि राजेश मेंढे यांना आपल्या वाहनात बसविले. पोलीस आरोपींसोबत डस्टरमध्ये बसून अज्ञात स्थळी रवाना झाले होते. याच दरम्यान रक्कम गायब झाली होती. नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखा या घटनेनंतर सचिन आणि रवीचा शोध घेत होते. पोलिसांना ते आर्टिगा क्रमांक एम. एच. ४९, यु-०७५४ ने गोव्याला गेल्याचे समजले. झोन ४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी साताराचे अधीक्षक संदीप पाटील यांना वाहनाची माहिती देऊन आरोपींना अटक करण्याची विनंती केली. मंगळवारी रात्री रवी आणि सचिन आपला साथीदार पिंटु वासनिक आणि गजानन मुनमुने याच्या सोबत महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये सापडले.
त्यांच्या जवळ लुटीचे २.८२ लाख रुपये जप्त करण्यात आले. सातारा पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना गुन्हे शाखा पोलिसांना सोपविले. पोलीस रात्री उशिरा त्यांना घेऊन नागपुरात पोहोचले. आरोपींनी सांगितल्यानंतर कुणालाही नवल वाटेल. सूत्रांनुसार पोलीस सचिन पडगिलवार आणि रवी माचेवारसोबत डस्टर घेऊन हसनबाग चौकीत पोहोचले. तेथे स्कू्र ड्रायव्हरच्या मदतीने लॉकर उघडून पैसे काढले. ठरलेल्या योजनेनुसार नंदनवन ठाण्यातील एक अधिकारी तेथे पोहोचला. तो ही रक्कम घेऊन आपल्या बाईकने रवाना झाला. त्यानंतर पोलीस कर्मचारी डस्टर घेऊन नंदनवन ठाण्यात पोहोचले. त्यानंतर नवनीत आणि राजेशला त्यांच्या मालकाबाबत विचारणा करण्यात आली. सकाळी ७ वाजता मनीष खंडेलवाल ठाण्यात पोहोचल्यानंतर डस्टरमधुन ३ कोटी १८ लाख रुपये मिळाल्याची माहिती समजली. त्यानंतर २.५५ कोटी रुपये पळविल्याची चर्चा पसरली.
या लुटीचा भंडाफोड झाल्यामुळे कारवाईत सामील अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. त्यांनी त्वरित सचिन आणि रवीसोबत संपर्क साधला. त्यांना काही दिवस फरार राहण्यास सांगितले. दोघेही पिंटु वासनिक आणि गजानन मुनमुने सोबत गोवा फिरण्यासाठी गेले. ते सोलापूर, कोल्हापूर या मार्गाने गोव्याला जाणार होते. दरम्यान पोलीस आपल्या शोधात गोव्याला पोहोचल्याचे त्यांना समजले. त्यामुळे गोव्याऐवजी ते महाबळेश्वरला पोहोचले. महाबळेश्वरला सातारा पोलिसांनी त्यांना पकडले. गुन्हे शाखेने आरोपींना नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. नंदनवन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
विमानाने रवाना झाले पोलिसांचे पथक
झोन ४ चे उपायुक्त निलेश भरणे यांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण गंभीरतेने घेतले होते. तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्याच ते पक्षात होते. त्यांनीच सातारा पोलीसांना आरोपींचे नेमके ‘लोकेशन’ सांगितले. नंदनवन पोलीस मंगळवारी रात्री विमानाने पुण्यालादेखील पोहोचले. त्याच्या अगोदरच सातारा पोलिसांनी आरोपींना गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले होते.
‘लोकमत’ने केला होता खुलासा
या घटनेचा ‘लोकमत’ने पहिल्यांदा खुलासा केला होता. सचिन पडगिलवार आणि रवी माचेलवार यांचा या घटनेत हात असल्याचे सांगितले होते. लुटमारीची घटना घडविणाऱ्या  पोलिसांनी हवाला व्यापाऱ्यातर्फे दबाव टाकण्याचा खोटा आरोप लावण्याचा दावा केला होता. ‘लोकमत’ने पोलिसांनीच लुटमार केल्याची पुष्टी केली होती. नंदनवन पोलिसांनी ही कारवाई सचिन आणि रवीच्या इशाऱ्यावरच केली होती. दोघांनी लुटीची कबुली केल्यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

Web Title: Nagpur's Nandanawan police grabbed 2.55 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.