नागपूरच्या ‘नीट’ महाघोटाळ्याची देशभरात ‘लिंक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:41+5:302021-09-24T04:09:41+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या ...
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखो रुपयांच्या मोबदल्यात नीट परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी डमी उमेदवार उभे करण्याच्या देशपातळीवरील रॅकेटचे धागेदोरे नागपुरात सापडल्याने ‘कोचिंग क्लास’ जगताला हादरा बसला आहे. या घोटाळ्याची लिंक केवळ नागपूरच नव्हे तर देशातील इतरही शहरात होती. नागपूरसह दिल्लीच्या कार्यालयातूनदेखील ‘रॅकेट’ सुरू होते व पालकांना जाळ्यात ओढण्यासाठी विविध ठिकाणी ‘एजंट्स’देखील नेमले होते. विशेष म्हणजे परिमल हा वैद्यकीय प्रवेशाच्या गैरप्रकारांमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय होता व त्याला २०१५ मध्ये अटकदेखील झाली होती, अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली आहे.
आर.के.एज्युकेशन या संस्थेच्या माध्यमातून परिमल व त्याचे एजंट्स देशातील विविध शहरांतील पालकांशी संपर्क करायचे. मोठमोठ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचे आमिष देऊन ते त्यांना जाळ्यात ओढायचे. परीक्षेसाठी ‘डमी’ उमेदवारदेखील देशातील वेगवेगळ्या भागातून तयार केले जायचे. या संस्थेचे एक कार्यालय नवी दिल्ली येथील नेहरू पॅलेस मेट्रो स्थानकाजवळ होते. विशेष म्हणजे पालकांकडून विद्यार्थ्यांचा ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ घेऊन ‘डमी’ उमेदवारांच्या सोयीच्या शहरातच परीक्षा केंद्राचा पर्याय दिला जायचा. यातूनच राची व दिल्ली येथे डमी उमेदवार बसविण्याची योजना ठरली. यात दिवाकर व मुन्ना हे परिमलचे दोन साथीदारदेखील सहभागी होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘सेटिंग’मधून अनेकांचे प्रवेश
‘नीट’चा हा महाघोटाळा केवळ याच वर्षीचा नसून मागील काही वर्षांपासून परिमल या कामात होता. आर.के. एज्युकेशनच्या माध्यमातून २०२० सालच्या ‘नीट’मध्येदेखील याच पद्धतीने पालकांना संपर्क करण्यात आला होता. परीक्षा देण्यापासून ते प्रवेश करून देण्यापर्यंतच्या पूर्ण ‘सेटिंग’चा या ‘रॅकेट’मध्ये समावेश होता. त्यामुळे अशा पद्धतीने परीक्षा देऊन देशात नेमक्या किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे याची चाचपणीदेखील सुरक्षा यंत्रणांकडून करण्यात येत आहे. यातून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.
‘हायटेक कॉपी’मध्ये २०१५ साली झाली होती अटक
या ‘रॅकेट’चा सूत्रधार परिमल कोतपल्लीवार हा मूळचा नागपूरचाच असून वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील गैरप्रकारांमध्ये तो अनेक वर्षांपासून लिप्त आहे. २०१५ साली ‘एआयपीएमटी’ परीक्षेत अत्याधुनिक ‘गॅजेट्स’चा वापर करून ‘कॉपी’ करण्याच्या प्रकाराने देशभरातील शिक्षण वर्तुळाला हादरा बसला होता. त्या ‘रॅकेट’मध्येदेखील परिमल सहभागी होता. विद्यार्थी ‘मायक्रो स्पीकर्स’ ‘नॅनो इअर फोन्स’, ‘आयवॉच स्कॅनर’ इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थी बाहेर प्रश्न पाठवत होते व हरयाणाच्या बहरोद येथून त्यांना उत्तरे सांगण्यात येत होती. परिमलने तेव्हा प्रतिविद्यार्थी १७ लाख रुपयांच्या ‘डील’वर शहरातीलच सात विद्यार्थ्यांशी ‘डील’ केली होती. ग्रेट नाग रोडवर त्याने याच कामासाठी कार्यालयदेखील स्थापन केले होते. हरयाणा पोलिसांच्या ‘एसआयटी’ने या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली होती व तत्कालीन डीएसपी अमित भाटिया यांच्या नेतृत्वातील चमूने परिमलला ६ मे २०१५ रोजी अटक केली होती.