कस्तूरचंद पार्क ठरणार नागपूरचे नवे आयकॉन

By admin | Published: April 22, 2017 03:06 AM2017-04-22T03:06:43+5:302017-04-22T03:06:43+5:30

कस्तूरचंद पार्क ही नागपूरची ओळख आहे. येथील ऐतिहासिक वारसाच्या जतनासोबतच त्याचा अत्याधुनिक विकास करण्यात येणार आहे.

Nagpur's new icon will be the Kasturchand Park | कस्तूरचंद पार्क ठरणार नागपूरचे नवे आयकॉन

कस्तूरचंद पार्क ठरणार नागपूरचे नवे आयकॉन

Next

आयडिया व मनोरमाबाई मुंडले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे संयुक्त डिझाईन ठरले सर्वोत्कृष्ट
नागपूर : कस्तूरचंद पार्क ही नागपूरची ओळख आहे. येथील ऐतिहासिक वारसाच्या जतनासोबतच त्याचा अत्याधुनिक विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने डिझाईनची स्पर्धा भरवली होती. त्यातून आयडियाज नागपूर आणि मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चर कॉलेज (एसएमएमसीए) या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले संयुक्त डिझाईन सर्वोत्कृष्ट डिझाईन म्हणून निवडण्यात आले आहे. या डिझाईनचे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या उपस्थितीत सादरीकरण करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कस्तूरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व कायम ठेवून त्याचा कसा विकास करता येईल, यासाठी आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला गेला. त्यातून पाच डिझाईनची निवड करण्यात. यापैकी आयडियाज आणि मनोरमाबाई मुंडले आर्किटेक्चरचे डिझाईन निवडण्यात आले. या दोन्ही डिझाईन मिळून एक संयुक्त डिझाईन पुन्हा तयार करण्यात आले. प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा यांच्या मार्गदर्शनाखाली देवेश चिंधे, निशा बोथरा, रौनक अग्रवाल, शरयू राहाटे, सिमरन शर्मा आणि सोनाली फुलवानी या विद्यार्थ्यांनी हे संयुक्त डिझाईन तयार केले.
या डिझाईनमध्ये कस्तूरचंद पार्कचे मैदान कायम ठेवून ऐतिहासिक स्मारकाला अधिक विकसित करण्यात आले आहे. यासोबतच कस्तूरचंद पार्कवर सायकल ट्रॅक, मड वॉकिंग ट्रॅक, पार्किंग, झाडे, शौचालये, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे. कस्तूरचंद पार्कवरील मेट्रो स्टेशनच्या भिंतीचा वापर करीत त्यावर १२० वाय ४० इतके मोठी स्क्रीन,. या स्क्रीनचा वापर मोठ्या जाहीर सभा किंवा जाहिरातीसाठी करता येऊ शकतो. एकूणच कस्तूरचंद पार्क हे नागपूरचे आयकॉन ठरेल असे हे डिझाईन तयार करण्यात आले आहे. प्राथमिक स्तरावर या विकासासाठी ४ कोटी ५० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट डिझाईनबद्दल दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रत्येकी ११ हजार रुपयाचा धनादेश व प्रमाणपत्र देऊन पुरस्कृत करण्यात आले. यावेळी अशोक मोखा, डॉ. उज्ज्वला चक्रदेव, प्रा. विजय मुन्शी, पी.एस. पाटणकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांसमोर ४ मेला सादरीकरण
पालकमंत्री बावनकुळे व जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना हे डिझाईन आवडले आहे. यानंतर येत्या ४ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर रामगिरी येथे या डिझाईनचे सादरीकरण करण्यात येईल. त्यानंतर त्यांना पसंत आल्यास या डिझाईनला अंतिम मंजुरी मिळेल. तसेच हेरिटेज समितीच्या मंजुरीनंतर या डिझाईननुसार कामाला सुरुवात होईल.
लोकमतचा २०० फूट उंच राष्ट्रध्वज देणार प्रेरणा
दरम्यान लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तूरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. युवकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा तिरंगा प्रेरणादायी ठरेल. या ध्वजस्तंभाची उंची २०० फूट असून त्यावरील राष्ट्रध्वजाचा आकार अंदाजे ९० बाय ६० फूट राहील. हा राष्ट्रध्वज येत्या काळात नागपूरच्या इतिहासातील अभिमानास्पद ओळख ठरेल. कस्तूरचंद पार्कच्या विकासाचे जे डिझाईन तयार करण्यात आले आहे, त्यात या तिरंग्याचाही समावेश आहे.

Web Title: Nagpur's new icon will be the Kasturchand Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.