नागपूरचे नवीन महापौर सोमवारी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 10:30 PM2019-11-16T22:30:13+5:302019-11-16T22:32:29+5:30
नागपूर शहराचा नवीन महापौर कोण राहणार याचा उलगडा सोमवारी होणार आहे. कारण सोमवारी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला करावयाचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहराचा नवीन महापौर कोण राहणार याचा उलगडा सोमवारी होणार आहे. कारण सोमवारी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला करावयाचा आहे. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता भाजपला आव्हान मिळण्याची शक्यता नाही. पण संख्याबळ नसूनही काँग्रेसतर्फे महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपची सत्ता नसल्याने महापालिकेला भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. याचा विचार करता अनुभवी व महापालिका नियम व कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे.
महापौर पदासाठी सत्तापक्ष नेता संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी व चेतना टांक आदींच्या नावाची चर्चा आहे. भाजपातील काही असंतुष्ट नेत्यांकडून महापौर पदासाठी संजय बंगाले, वर्षा ठाकरे आदींचे नावे पुढे केली जात आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवक फारसे इच्छूक दिसत नव्हते. त्यामुळे भाजप बाहेरील नगरसेवकाला हे पद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होताच उपमहापौर पदासाठी पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरपद पुरूष नगरसेवकाला दिल्यास उपमहापौरपदी महिला नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
महापालिकेतील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात शनिवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. यात महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेस उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला काँग्रेसचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. पक्षातील गटबाजी अजूनही कायम आहे.
सव्वादोन वर्षानंतर महापालिकेची निवडणूक आहे. याचा विचार करता महापौरपदी सक्षम व्यक्तीची गरज आहे. भाजपचे जगदीश ग्वालबंशी यांचे निधन झाले आहे. तर दूर्गा हाथीठेले अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात १५१ जागापैकी १४९ नगरसेवक आहेत. यात भाजपचे १०६ नगरसेवक आहेत. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रविवारी नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.
२२ नोव्हेंबरला निवडणूक
महापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करतील. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाईल. शुक्रवारी २२ नोव्हेंबरला महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. २१ नोव्हेंबरला महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळ संपत आहे. नवीन महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ अडीच वर्षासाठी राहील. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.